अबब… तब्बल ३,६७६ किलोमीटर अंतर उडून सारस पक्षी पोहचला राजस्थानात..
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अबब… तब्बल ३,६७६ किलोमीटर अंतर उडून सारस पक्षी पोहचला राजस्थानात..

अबब… तब्बल ३,६७६ किलोमीटर अंतर उडून सारस पक्षी पोहचला राजस्थानात..

Nov 27, 2024 03:47 PM IST

एक सारस बगळा रशियाच्या पार टोकाला असलेल्या सैबेरिया प्रांतातून ३६७६ किलोमीटर उड्डाण करत भारतात राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील खिचन गावात पोहोचला. सारस पक्षाच्या पायाला लावलेल्या टॅगमधून ही माहिती मिळाली आहे.

३,६७६ किलोमीटर अंतर उडून सारस पक्षी पोहचला राजस्थानात
३,६७६ किलोमीटर अंतर उडून सारस पक्षी पोहचला राजस्थानात

ऋतू बदल झाल्यावर पक्ष्यांच्या स्थलांतराला सुरूवात होते. काही पक्षी प्रजननासाठी तर काही पक्षी कडक हिवाळा ऋतू टाळण्यासाठी स्थलांतरित होत असतात. असाच एक बगळा रशियाच्या पार टोकाला असलेल्या सैबेरिया प्रांतातून तब्बल ३६७६ किलोमीटर उडत भारतात राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील खिचन गावात आला असल्याची नोंद येथील पक्षीनिरीक्षकांनी केली आहे. या बगळ्याच्या पायाला लावलेल्या टॅगमधून ही माहिती मिळाली आहे. हा नर जातीचा बगळा असून २० जुलै २०२४ रोजी रशियात बगळ्यावर संशोधन करणाऱ्या पक्षीतज्ज्ञांनी त्याच्या पायाला टॅग लावला होता, अशी माहिती रशियातील बगळ्याच्या अभ्यासक एलेना मुद्रिक यांनी दिली.

बगळ्याने बदलला मार्ग

जुलै महिन्यात या बगळ्याने रशियाच्या सैबेरिया प्रांताच्या दक्षिणेस असलेल्या तिवा प्रांतातून आपल्या उड्डाण प्रवासाला सुरूवात केली. मात्र रशियातून भारतात येण्यासाठी या बगळ्याने नेहमीच्या स्थलांतराचा मार्ग न घेता वेगळा मार्ग घेतल्याचे पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बगळ्याने संपूर्ण रशिया, कजाखस्तान, तुर्केमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानवरून उड्डाण करून राजस्थानात प्रवेश केला. मात्र रशियातून भारतात स्थलांतर करणारे पक्षी उड्डाणासाठी हिमालय पर्वताच्या मार्गाने भारतात येत असल्याचे पक्षीतज्ञांचे म्हणणे आहे. स्थलांतरित पक्षी हिमालय पर्वत ओलांडून नेपाळ मार्गे भारतात प्रवेश करत असतात. मात्र या बगळ्याने भारतात आगमनासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.

Demoiselle Cranes ही सारस पक्षाची एक प्रजाती असून हे पक्षी काळा समुद्र, मंगोलिया, उत्तर-पूर्व चीन तसेच तुर्कीमध्ये आढळतात. जगात या पक्षांची संख्या फार कमी शिल्लक राहिली आहे. कडक हिवाळ्यातील महिने घालवण्यासाठी हा पक्षी दक्षिणेकडे म्हणजे आफ्रिकी देश तसेच भारतीय उपखंडात स्थलांतर करत असतात. आकाराने लहान, उंच, सडपातळ आणि नाजूक दिसणाऱ्या या पक्षांचा रंग प्रामुख्याने राखाडी असतो तर मान आणि डोके काळ्या रंगाचे असते. त्यांच्या डोळ्यांपासून डोक्याच्या मागच्या बाजूला एक पांढरा पट्टा असतो. हे सारस पक्षी १६ हजार ते २६ हजार फूट उंचावरून उडत खूप कठोर परिश्रम घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. हे पक्षी दरवर्षी दोन वेळा हिमालय पर्वत ओलांडतात. या स्थलांतरादरम्यान अनेकदा त्यांची उपासमार होतो. उड्डाणादरम्यान थकल्यामुळे थांबले असता गरुडपक्षी अनेकदा त्यांची शिकार करतात.

खिचन- पक्षीनिरीक्षकांसाठी वाळवंटात जणू स्वर्ग

राजस्थानातील फलोदी जिल्ह्यात पसरलेल्या वाळवंटाच्या मधोमध खिचन पक्षी अभयारण्य वसले आहे. रशिया, सैबेरिया, मंगोलिया या देशातून स्थलांतर करून सारस बगळे येथे येत असतात. या सारसना पाहण्यासाठी देशभरातील पक्षीनिरीक्षक येथे येत असतात. 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर