हरियाणा (Haryana) मधील चरखी दादरी येथे गोरक्षकांच्या जमावाने गोमांस खाल्ल्याच्या संशयातून (Suspicion of Eating Beef) एका परप्रांतीय मजुराची बेदम मारहाण करत हत्या (Mob Lynching) केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये जमाव दोन तरुणांना मारहाण करत असल्याचे दिसते. यावेळी काही लोक मध्यस्थी करत या तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मात्र गोरक्षक कुणाचेच ऐकत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २७ ऑगस्ट रोजीची आहे. या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच लोकांना अटक केली आहे. त्याचबरोबर दोन अल्पवयीन मुलांनाही पकडले आहे..
ही घटना हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यात घडली आहे. मृत व्यक्ती पश्चिम बंगालमधील स्थलांतरित मजूर होता. साबिर मलिक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून आरोपींनी २७ ऑगस्ट रोजी साबिर मलिक यांची हत्या केली होती. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. या घटनेवर सीएम नायब सिंह सैनी म्हणाले की, गावोगावी गोमातेशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. अशा घटना दुर्दैवी आहेत.
साबिर मलिक याच्यावर गोमांस खाल्ल्याचा संशय होता. याबाबत गोरक्षक दलाचे सदस्य सक्रिय झाले. आरोपी अभिषेक, मोहित, रवींद्र, कमलजीत आणि साहिल यांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या विकण्याच्या बहाण्याने साबिर मलिक यांना दुकानात बोलावले. यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली.
तरुणाला मारहाण होताना पाहून काही स्थानिकांनी मध्यस्थी केली. यानंतरही आरोपींनी साबिर मलिकला दुसऱ्या ठिकाणी नेले. तेथे आरोपींनी पुन्हा त्याला बेदम मारहाण केली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पीडित मलिक चरखी दादरी जिल्ह्यातील वांद्रे गावाजवळील झोपडपट्टीत राहत होता.
तो उदरनिर्वाहासाठी प्लास्टिक विकत होता. पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
चरखी दादरी प्रकरणावर हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले- मॉब लिंचिंगसारख्या गोष्टी योग्य नाहीत, कारण गोरक्षणासाठी विधानसभेत कडक कायदा करण्यात आला आहे. गोहत्येच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. गावोगावी गायमातेविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे. कोणी तरी अशी परिस्थिती करत आहे हे जर लोकांना कळले तर गावातील लोकांना कोण रोखू शकेल. अशा घटना घडू नयेत आणि या घटना दुर्दैवी आहेत, असे मला म्हणायचे आहे.
२०२३ मध्ये हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील लोहारू येथे अशीच खळबळजनक घटना घडली होती. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील नासिर आणि जुनैद या दोन मुस्लीम तरुणांचे कारमध्ये अपहरण करून हरियाणातील लोहारू येथे जाळून मारण्यात आले. लोहारूजवळ पूर्णपणे जळालेल्या वाहनात त्यांचे जळालेले मृतदेह आढळून आले. त्यामुळे अनेक भागात तणाव निर्माण झाला होता.