Covishield Vaccine: भारतात दिल्या जाणारी कोरोना प्रतिबंधक लसीबाबत नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असताना आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञांनी दिलासादायक माहिती शेअर केली. कोविशिल्ड लसीबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोविशिल्डची लस घेतलेल्यांपैकी क्वचितच लोकांवर त्याचे दुष्परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. कोविशिल्ड लस घेतलेल्या १० लाख लोकांमध्ये फक्त ७ ते ८ जणांना हृदय विकाराचा झटका, ब्लड क्लॉटिंग यांसारखा धोका उद्भवण्याची शक्यता आहे, ज्याला थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम असे म्हटले जाते. आयएमसीआरचे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले की, कोविशिल्डपासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही.
डॉ. रमन गंगाखेडकर यांनी न्यूज १८ शी बोलताना म्हणाले की, पहिल्यांदा लस घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक धोका असतो. दुसरी लस घेतल्यानंतर धोका कमी होतो आणि तिसरी लस घेतल्यानंतर हा धोका कायमचा टळतो. कोविशिल्डचे परिणाम लस घेतल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यातच दिसायला सुरु होतात. लस घेऊन वर्ष उलटले, अशा लोकांनी चिंता करण्याची गरज नाही. ब्रिटेनमधील कोर्टात सुनावणी करताना हे प्रकरण समोर आले. काही मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते की, कोरोना लस घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा हे प्रकरण चालू होते, तेव्हा लस तयार करणारी कंपनी AstraZeneca ने न्यायालयात कबूल केले की, क्वचित प्रसंगी रक्त गोठण्याची समस्या असू शकते. भारतात ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे, ज्याला कोविशील्ड असे नाव देण्यात आले. भारतातील सुमारे ९० टक्के लोकांना कोविशिल्डद्वारे लसीकरण करण्यात आले. ब्रिटनमधील प्रकरणाची बातमी मीडियात आल्यावर भारतातही काही लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञाला याबाबत विचारले असता त्यांनी ते नाकारले. ते म्हणाले की कोणत्याही लसीचे काही साइड इफेक्ट्स असू शकतात, परंतु ते कालांतराने नष्ट होतात.
डॉ.रमण गंगाखेडकर म्हणतात की, १० लाखांपैकी केवळ सात किंवा आठ लोकांना दुष्परिणामांचा धोका निर्माण होऊ शकतो, हे समजून घेण्याची गरज आहे. ब्रिटीश वृत्तपत्र डेली टेलीग्राफने लिहिले आहे की, एस्ट्राजेनेकाने लंडनच्या उच्च न्यायालयाला सांगितले आहे की, क्वचित प्रकरणांमध्ये त्याच्या औषधाचे दुष्परिणाम होऊ शकतात.