देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात? भाजपची काँग्रेसवर टीका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात? भाजपची काँग्रेसवर टीका

देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात? भाजपची काँग्रेसवर टीका

Dec 30, 2024 06:51 PM IST

Rahul Gandhi News : मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल आहे, असे भाजपने म्हटले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी (PTI)

देशाचे माजी पंतप्रधान व आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवठा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून काँग्रेस व सत्ताधारी भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता नव्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. 

मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील वाद थांबताना दिसत नाही. या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकीकडे मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल आहे, असे भाजपने म्हटले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले आहेत. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला उपस्थित न राहिल्याबद्दल भाजपने काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका केली होती. मात्र, खासगीपणाचा आदर करून हे पाऊल उचलण्यात आल्याचे काँग्रेसने नंतर स्पष्ट केले.

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून राहुल गांधींवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी नववर्षाच्या स्वागतासाठी व्हिएतनामला जाणार आहेत. माजी पंतप्रधानांच्या मृत्यूवरून राहुल गांधी राजकारण करत आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत, असा आरोपही मालवीय यांनी केला. गांधी परिवार आणि काँग्रेस शीखांचा तिरस्कार करते. इंदिरा गांधींनी दरबार साहेबांचा अपमान केला होता हे विसरू नका.

दरम्यान, काँग्रेसनेही भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी खासगी दौऱ्यावर परदेशात गेले असून त्यात कुणालाही अडचण येऊ नये, असे काँग्रेसने म्हटले आहे. हा कोणाच्या तरी खासगीपणाचा विषय असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर म्हणाले की, हा पक्ष विभाजनकारी राजकारण कधी सोडणार? मोदींनी ज्या प्रकारे डॉ. साहेबांना यमुनेच्या तीरावर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास नकार दिला आणि ज्या प्रकारे त्यांच्या मंत्र्यांनी डॉ. साहेबांच्या कुटुंबाला घेराव घातला तो लज्जास्पद आहे. राहुल गांधी खाजगी प्रवास करत असतील तर तुम्हाला कशाला त्रास होतो? काँग्रेस खासदार म्हणाले की, नवीन वर्षात तरी सुधारा.

 

दरम्यान मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जित करण्यापासून काँग्रेस नेत्यांच्या गैरहजेरीवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या कुटूंबाच्या खासगीपणाचा आदर करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी पक्षाचा कोणताही ज्येष्ठ नेता  गेला नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सरदार डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी उचलण्यासाठी आणि विसर्जित करण्यासाठी कुटुंबासोबत गेले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंत्यसंस्कारानंतर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर