IAS whatsapp group controversy : केरळमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मोठा गदारोळ झाला आहे. काही अधिकाऱ्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून, ज्यात फक्त 'मल्लू हिंदू अधिकाऱ्यां'चा अॅड करण्यात आलं होतं. मात्र, ज्या अधिकाऱ्याचा मोबईल क्रमांकावरून हा ग्रुप तयार करण्यात आला होता. त्या अधिकाऱ्याने त्याचा मोबाइल फोन हॅक झाल्याचे कारण सांगितलं आहे. आयएएस अधिकाऱ्यांनी या प्रकारे धर्माच्या आधारे वेगळा गट तयार करण्याची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळ कॅडरचे अनेक अधिकारी ३१ ऑक्टोबर रोजी अचानक 'मल्लू हिंदू ऑफिसर्स' नावाच्या नवीन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा ग्रुप केवळ हिंदू कॅडरच्या अधिकाऱ्यांचा होता आणि आयएएस अधिकारी के. गोपालकृष्णन यांच्या नंबरचा वापर करून हा ग्रुप तयार करण्यात आला होता.
या ग्रुप स्थापन झाल्यानंतरच आक्षेप घेण्यात आले. आयएएसअधिकाऱ्यांचा हा ग्रुप धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, विरोध झाल्याने हा ग्रुप स्थापन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी डिलीत देखील करण्यात आला. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गोपालकृष्णन यांचं म्हणणं आहे की, त्यांचा फोन हॅक झाला होता. त्यांच्या संमतीशिवाय अनेक ग्रुप तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या प्रकरणी अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. अधिकाऱ्यांमध्ये अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत, पण धर्मावर आधारित ग्रुप तयार करण्याची घटना ही पहिल्यांदाच घडली आहे. वेगवेगळ्या सेवांमुळे कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्वतंत्र गट असल्याचेही त्यांनी सांगितलं. भाषेसह इतर अनेक विषयांवर गट असतात, पण धर्माच्या आधारे गट तयार होणे यापूर्वी कधीच झाले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले की, ग्रुपमध्ये सामील झालेल्या काही अधिकाऱ्यांनी एजन्सीला माहिती दिली होती. या अधिकाऱ्यांनी पुरावेही सादर केले. त्यानंतर एजन्सीने कारवाई करून अहवाल तयार केल्याचे समजते. सध्या राज्य आणि केंद्र पातळीवरील गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.