मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  केंद्राच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात कॉंग्रेसची देशभर निदर्शनं

केंद्राच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात कॉंग्रेसची देशभर निदर्शनं

HT Marathi Desk HT Marathi
Jun 27, 2022 09:11 PM IST

लष्करात तरुणांना चार वर्ष कालावधीसाठी भरती होण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे देशभरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

Congress workers raise slogans during the party's 'Satyagraha' against the 'Agnipath' scheme in New Delhi
Congress workers raise slogans during the party's 'Satyagraha' against the 'Agnipath' scheme in New Delhi (HT_PRINT)

लष्करात तरुणांना चार वर्ष कालावधीसाठी भरती होण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे देशभर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. देशभरातील ३५०० विधानसभा मुख्यालयांवर हे आंदोलन करण्यात आले. तरुणांना कंत्राटी पद्धतीने लष्करात भरती करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचं सांगत कॉंग्रेसने या योजनेला तीव्र विरोध केला आहे. ही भरती योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेस पक्षाकडून आज एक निवेदन सादर करण्यात आले.

‘सरकारने नागरिकांना सुरक्षा पुरवावी, असुरक्षा प्रदान करू नये. अग्निपथ ही लोकांचे लक्ष वेधून घेण्याची युक्ती आहे. चीनसारख्या देशाकडून सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेला असताना सरकारने असल्या युक्त्या करू नये’, अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी दिल्लीत केली.

‘अग्निपथ’विरोधात महाराष्ट्रात सत्याग्रह आंदोलन

‘अग्निपथ’ योजना आणून देशसेवेच्या व्रताला काळीमा फासण्याचे आणि बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पटोले म्हणाले की, अग्निपथ योजना ही सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करु पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न धुळीस मिळवणारी योजना आहे. या योजनेला तरुणांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणारी आहे तसेच चार वर्ष नोकरी केल्यानंतर या जवानांना पुन्हा नोकरीसाठी भटकावे लागणार आहे. जवानांचा असा अपमान काँग्रेसला कदापि सहन होणार नाही. ही योजना रद्द करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. या आंदोलनात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बेरोजगार तरुण सहभागी झाले होते.

IPL_Entry_Point