SP Congress Alliance in UP : 'अबकी बार ४०० पार' अशी घोषणा देत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात मोठं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. यूपीतील प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. त्यामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम दोन महिने उरले आहेत. त्यामुळं सत्ताधारी एनडीए व इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी स्वबळाचा मार्ग धरला आहे. त्यामुळं इंडिया आघाडी खिळखिळी झाली असं वाटत असतानाच उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं जमलं आहे. खुद्द समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी स्वत: यास दुजोरा दिला आहे. 'सर्व काही चांगलं झालं आहे. युती होईल यात शंका नाही. लवकरच सर्व काही स्पष्ट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्ष काँग्रेसला १७ जागा देण्यास तयार झाला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार असलेल्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवर समाजवादी पक्षानं आधीच उमेदवार जाहीर केला होती. मात्र, आता तिथून उमेदवार मागे घेतला जाणार आहे. तर, काँग्रेसनं त्या बदल्यात मुरादाबादची जागा सोडली आहे.
जागावाटपावरून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात बराच तणाव निर्माण झाला होता. सपानं काँग्रेसला ११ जागा देऊ केल्या होत्या. मात्र, काँग्रेसनं त्यावर काहीच प्रतिसाद न दिल्यानं अखिलेश यांनी उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं दोन्ही पक्षांतील चर्चा थांबली होती. प्रियंका गांधी यांनी ही कोंडी फोडली. प्रियंका यांनी मंगळवारी स्वत: अखिलेश यादव यांना फोन केला व चर्चा केली. त्यानंतर चर्चेची गाडी पुन्हा रुळावर आली.
अमेठी, रायबरेली, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झाशी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, शाहजहांपूर, मथुरा आणि श्रावस्ती या जागांवर काँग्रेस निवडणूक लढवू शकते. यापैकी श्रावस्ती जागेविषयी अद्यापही चर्चा सुरू असून काही वेळात यावर निर्णय होऊ शकतो. काँग्रेस आणि सपा यांच्यातील युतीची घोषणा आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे. अखिलेश यादव, प्रियांका गांधी हे देखील यावेळी उपस्थित राहतील असं बोललं जातं.
केंद्रात सत्तेत येऊ इच्छिणाऱ्या पक्षासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यातून संसदेत सर्वाधिक ८० खासदार निवडून जातात. भाजपनं मागील दोन्ही निवडणुकांमध्ये यूपीमध्ये सर्वाधिक जागा जिंकून केंद्रातील सत्ता सहज ताब्यात घेतली होती. त्यामुळंच काँग्रेस व समाजवादी पक्षातील युती इथं महत्त्वाची ठरणार आहे. या युतीचा भाजपच्या किती जागांवर परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.