Congress manifesto : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. सध्या प्रचाराला सुरुवात झाली असून निवडून आल्यावर अनेक कामे करण्याची प्रलोभने मतदार राजाला दाखवली जात आहे. अशातच आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तब्बल ४८ पानी असलेल्या या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव ते ३० लाख सरकारी नोकऱ्या, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, हवामान, न्याय, संरक्षण यावर भर देण्यात आला आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तसेच आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला न्याय पत्र म्हटले आहे. हा जाहीरनामा ‘ग्यान’ या संकल्पनेवर आधारीत ठेवण्यात आला आहे. या जाहीरनाम्या बद्दल बोलतांना राहुल गांधी म्हणाले, जी म्हणजे गरीब, वाय म्हणजे यूथ, ए म्हणजे अन्नदाता तर एन म्हणजे नारी. या घटकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमचा जाहीरनामा तयार केला आहे. सत्ता येताच प्रामुख्याने या जाहीर नाम्याची अमलबजावणी करण्यात येईल असे देखील राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेला या जाहिरनाम्याचे १० भाग करण्यात आले आहे. यात रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, आरोग्य, घटनादुरुस्ती आणि संविधानाचे संरक्षण या सारख्या मुद्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या सोबतच देशभर जातीवर आधारित जनगणना करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की त्यांचा जाहीरनामा पाच न्यायांवर आधारित आहे (भागधारक न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय आणि युवा न्याय). युथ जस्टिस अंतर्गत काँग्रेसने ज्या पाच हमींची चर्चा केली त्यात ३० लाख सरकारी नोकऱ्या आणि तरुणांना वर्षभरासाठी १ लाख रुपये देण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.
जाहिरनाम्याबद्दल माहिती देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, २०२४ मध्ये केंद्रात आमचे सरकार स्थापन झाल्यास सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासनही देण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात पाच न्यायमूर्ती आणि २५ प्रकारच्या हमींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास मनरेगा अंतर्गत मजुरांची मजुरी ४०० रुपये केली जाईल, असेही खरगे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात अनेक गोष्टीवर भर देण्यात आला आहे. यात सामाजिक, न्याय, धार्मिक आणि भाषिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याच्या समस्या, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांना केंद्रित करण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना स्वामिनाथन यांनी सुचवलेल्या अनेक तरतुदी लागू करण्यात येईल असे म्हटले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किमत आणि हमी भाव लागू केला जाणार आहे. तर ३० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सोबतच सरकारी नोकरीमधील कत्रांटी धोरण रद्द करणार, सर्व नोकऱ्या कायमस्वरुपी करणार, तर एस, एसटी, ओबीसी साठी खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण दिले जाणार, जातीच्या आधारे कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये, यासाठी रोहित वेमुला कायदा आणणार अशी आश्वासने दिली आहेत.
- नोकऱ्यांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) दहा टक्के कोटा सर्व जाती, समुदायांसाठी कोणताही भेदभाव न करता लागू केला जाईल.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती मंजूर करेल याची काँग्रेस हमी देते.
- काँग्रेस देशव्यापी सामाजिक-आर्थिक आणि जातीच्या आधारावर जनगणना करणार.
- सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कॅशलेस विम्याचे राजस्थान मॉडेल स्वीकारले जाईल.
- किसान न्याय अंतर्गत शेतकाऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) ला कायदेशीर दर्जा दिला जाईल.
- कर्जमाफी आयोग स्थापन करणार तसेच शेतमाल जीएसटीमुक्त करणार
कामगार न्यायाअंतर्गत कामगारांना आरोग्याचा हक्क देण्याचे आश्वासन, किमान वेतन ४०० रुपये प्रतिदिन आणि शहरी रोजगार हमी योजना राबवणार.
- नारी न्यायमध्ये महालक्ष्मी हमी अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येकी १ लाख रुपये देणीयचे आश्वासन.
- सत्तेत आल्यानंतर नव्या शैक्षणिक धोरणाबाबत राज्य सरकारांशी चर्चा करून त्यात सुधारणा करू, असेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.
- गेल्या १० वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
- उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय न्यायिक आयोग स्थापन करेल, असे आश्वासन काँग्रेसने दिले.
संबंधित बातम्या