हरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा पराभव: कॉंग्रेस प्रवक्त्याचा गंभीर आरोप
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा पराभव: कॉंग्रेस प्रवक्त्याचा गंभीर आरोप

हरियाणात जिथं EVM मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज दिसल्या नेमकं तिथंच कॉंग्रेसचा पराभव: कॉंग्रेस प्रवक्त्याचा गंभीर आरोप

Updated Oct 08, 2024 07:40 PM IST

हरियाणात ज्या-ज्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज केलेल्या आढळून आल्या त्या मशीनमधून वेगळा निकाल तर ज्या मशीनची बॅटरी ६०-७० टक्केच्या आसपास चार्ज असलेली दिसून आली त्यात निकाल वेगळा दिसून आल्याचं निरीक्षण कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नोंदवलं.

हरियाणात ईव्हीएम तंत्र जिंकलं, लोकतंत्र हरलं -जयराम रमेश
हरियाणात ईव्हीएम तंत्र जिंकलं, लोकतंत्र हरलं -जयराम रमेश (Ritik Jain )

हरियाणात आज जाहीर झालेले विधानसभा निवडणुकीचे निकाल कॉंग्रेस पक्षासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक असून वास्तविकतेच्या विरुद्ध लागले असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. हरियाणा निवडणुकीचे निकाल स्वीकारणे मला अशक्य आहे… असंही जयराम रमेश म्हणाले. हरियाणात निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ज्या-ज्या ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅटरी ९९ टक्के चार्ज केलेल्या आढळून आल्या त्या मशीनमधून वेगळा निकाल तर ज्या मशीनची बॅटरी ६०-७० टक्केच्या आसपास चार्ज असलेली दिसून आली त्यात निकाल वेगळा दिसून आल्याचं निरीक्षण कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नोंदवलं. ९९ टक्के चार्ज असलेल्या मशीनमध्ये कॉंग्रेसला खूप कमी मिते मिळाली असल्याचं खेरा म्हणाले. यासंबंधीची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल करणार असल्याचं खेरा म्हणाले. हरियाणातील हिस्सार, महेंद्रगड आणि पाणिपत या तीन जिल्ह्यांमधून कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमबाबतच्या या तक्रारी प्राप्त झाल्याचे खेरा यांनी सांगितले. कॉंग्रेस उमेदवारांनी त्या त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केली असल्याचं खेरा म्हणाले. आगामी काळात या सर्व तक्रारी एकत्र करून निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे ते म्हणाले.

हरियाणात ‘हेराफेरी’चा विजयः जयराम रमेश

हरियाणाचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि वास्तवाविरुद्ध असल्याचं जयराम रमेश म्हणाले. हरियाणातील लोकांनी राज्यात राजकीय परिवर्तन करण्यासाठी आपलं मन बनवलं होतं. आजचा निकाल त्याविरुद्ध आहे. त्यामुळे या परिस्थितीत आज जाहीर झालेले निकाल स्वीकारणे आम्हाला शक्य नसल्याचं रमेश म्हणाले. हरियाणात मतमोजणीची प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबतच्या गंभीर तक्रारी आल्या असल्याचे रमेश म्हणाले. हरियाणातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलणं झालं असून या एकत्रित तक्रारी घेऊन एक दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे रमेश म्हणाले. तत्पूर्वी, रमेश यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा ट्रेंड अपडेट करण्याबाबत अवास्तव विलंब करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं.

हरियाणात कॉंग्रेसचं काय चुकलं?

हरियाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. निवडणूक निकाल जाहीर होत असताना सुरुवातीच्या ट्रेंडमध्येच भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून आले होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार कामगिरी केल्यानंतर सुद्धा विधानसभेत मात्र हरियाणातील कॉंग्रेसचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहणे पक्षाला महागात पडल्याचे आता बोलले जात आहे. हरियाणात कॉंग्रेस पक्षाची उमेदवारांची निवड, अंतर्गत वाद या गोष्टींमुळे पराभव झाला असल्याचं बोललं जात आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर