मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mallikarjun Kharge: पन्नाशीच्या आत असलेल्यांना काँग्रेसमध्ये अच्छे दिन! नव्या अध्यक्षांची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge: पन्नाशीच्या आत असलेल्यांना काँग्रेसमध्ये अच्छे दिन! नव्या अध्यक्षांची मोठी घोषणा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 26, 2022 01:12 PM IST

Mallikarjun Kharge: खर्गे यांनी काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना म्हटलं की, "एका सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसचा अध्यक्ष केल्याबद्दल मी आभार मानतो.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (PTI)

Mallikarjun Kharge: काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. खर्गे यांनी काँग्रेस नेत्यांना संबोधित करताना म्हटलं की, "एका सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसचा अध्यक्ष केल्याबद्दल मी आभार मानतो. माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. सोनिया गांधी यांनी कष्टाने पक्षाला सांभाळलं आहे. मीसुद्धा पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करेन." यावेळी खर्गे यांनी मोठी घोषणा केली ती म्हणजे संघटनेतील ५० टक्के पदे ही ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नेत्यांसाठी आरक्षित करण्याची घोषणा.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, न्यू इंडियात रोजगार नाही. देशात महागाईने कळस गाठलाय. सरकार झोपले आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लोकांना टार्गेट केलं जात आहे. आजच्या राजकारणात खोट्याचा बोलबाला झाला आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खर्गेंचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, मी नव्या काँग्रेस अध्यक्षांचे अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे ज्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं आहे ते एक अनुभवी आणि सर्वसामान्यांशी जोडलेले नेते आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ही उंची गाठली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील म्हणाले की, खर्गेंची धोरणे ही पंडित जवाहरलाल नेहरूंचे धोरणे असतील. लोकशाही आणि समाजवाद भक्कम करायचा आहे, जाती व्यवस्था संपवायची आहे. यात काही नवी धोरणेही येऊ शकतील."

WhatsApp channel

संबंधित बातम्या