Congress: राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली. या यादीत देशभरातील ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार मुकुल वासनिक या दोन नेत्यांवर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एके अँटनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंह, चरणजीत सिंग चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहे. आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांनाही या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे, जे काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा होती.
काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. यादी जाहीर करण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र, या नव्या समितीत फारसा बदल करण्यात आलेला नाही.
मल्लिकार्जुन खरगे,सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी. चिदम्बरम, तारिक अन्वर, पु. लालथनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंह चन्नी, प्रियांका गांधी वाड्रा, कुमारी शैलजा, गईखंगम गंगमई, एन. रघुवीरा रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश ठाकोर, जीए मीर, अविनाश पांडे, दीपा दास मुन्शी, महेंद्रजीत सिंह मालविय, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसैन, कमलेश्वर पटेल, के. सी. वेणुगोपाल.