Congress President: काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे. अखेरच्या टप्प्यात आता काँग्रेसने मोहरा बदलल्याचं म्हटलं जात आहे. सुरुवातीपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांधी कुटुंबीयांचे विश्वासू असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते. ते अर्जही दाखल करणार आहेत. मात्र राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. त्यावरून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांचे दोन गट पडले आहेत.
अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. अद्याप त्यांची भेट झालेली नाही. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपण अध्यक्षपदासाठी अर्ज उद्या अर्ज करणार असल्याचं म्हटलं आहे. याआधी म्हटलं जात होतं की, सोनिया गांधी आणि अशोक गेहलोत यांची बैठक होईपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही. मात्र आता दिग्विजय सिंह यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केलीय.
दिग्विजय सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "मी आज फॉर्म नेण्यासाठी आलो आहे, उद्या भरेन." याआधी मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये एका पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केली होतं की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार नाही. मात्र वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य करू असंही ते म्हणाले होते.
राजस्थानमध्ये काँग्रेसवर संकट असून यामुळे अशोक गेहलोत यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. गेहलोत यांच्यानतंर काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचा पर्याय ठेवला होता. असं म्हटलं जात होतं की, अध्यक्षपदाच्या निवडीवर सोनिया गांधी आणि गेहलोत यांच्यात एकमत न झाल्यास दिग्विजय सिंह यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलं जाईल. शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे.