राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Mar 24, 2023 05:46 PM IST

Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification
Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification (PTI)

Congress Party Protest Against Rahul Gandhi Disqualification : मोदींवरील टिप्पणीच्या प्रकरणात सूरत कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं या प्रकरणावरून मोठं राजकीय वादंग पेटलं असून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात दिल्ली, श्रीनगर आणि बंगळुरुसह देशातील अनेक शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलनं करण्यात येत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध करत केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

दिल्लीच्या अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध केला आहे. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. दिल्लीसह बंगळुरू आणि जम्मू-काश्मिरमध्येही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला आहे. यावेळी मोदी सरकारचा निषेध करणारी पोस्टराबाजी करण्यात आली. याशिवाय काँग्रेसच्या 'डरो मत' या घोषणेचाही नारा देण्यात आला आहे.

कारवाईविरोधात राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक...

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी काँग्रेसच्या आमदारांसह केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला आहे. यावेळी देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला. याशिवाय भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधी यांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळं मोदी सरकारकडून सूडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर