no-confidence motion in lok sabha : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर आज दुपारी १२ वाजेपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. लोकसभेत अविश्वास ठरावाची नोटीस देणारे काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या भाषणातून चर्चेची सुरुवात झाली आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी पहिल्याच भाषणातून मणिपूर हिंसाचार तसेच बलात्कार प्रकरणावरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय मोदींनी लोकसभेत येऊन सर्व मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
लोकसभेच्या सभागृहात बोलताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, मी नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा भाजपच्या अन्य नेत्यांवर बोलतो तेव्हा कुणालाही राग येत नाही. परंतु ज्यावेळी मी गौतम अदानी यांचं नाव घेतो त्यावेळी भाजपच्या खासदारांना राग का येतो?, असा सवाल गौरव गोगोई यांनी लोकसभेत करत भाजपला सुनावलं आहे. याशिवाय इंडोनेशियात पीएम मोदी आणि चीनचे पंतप्रधान यांच्यात काय डील झाली?, कोणत्या विषयांवर चर्चा झाली?, याची माहिती सरकारकडून अद्यापही का देण्यात आलेली नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मोदी सरकारला चहुबाजुंनी घेरलं आहे.
ज्यावेळी देशातील शेतकरी राजधानी दिल्लीत आंदोलन करत होता, त्यावेळी मोदींनी त्यावर एकही शब्द उच्चारला नाही. शेतकरी गरीब होत गेले परंतु अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने मोठी वाढ होत गेली. अदानी समुहाच्या अनेक कंपन्यांची संपत्ती सतत वाढत आहे, त्यांना कुणाचा आशिर्वाद आहे?, असा सवाल करत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडून गौरव गोगोई यांच्या भाषणानंतर आता भाजपाकडून खासदार निषिकांत दुबे यांचं भाषण सुरू झालं आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते भूमिका मांडणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज संध्याकाळी लोकसभेत भाषण करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला लोकसभेत उत्तर देणार आहे.