भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीन काळे कृषी कायदे पुन्हा लागू करण्याबाबत वक्तव्य केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. कंगना रणौतने या प्रकरणी माफी मागितली असून मला माझ्या वक्तव्याचा पश्चाताप असल्याचे म्हटले आहे. कंगना रणौतच्या या शेतकरीविरोधी वक्तव्यानंतर राजकारण तापलं आहे. भाजप पुन्हा शेतकरीविरोधी तिन्ही काळे कायदे आणणार असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. आता काँग्रेस खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवत जाब विचारला आहे. ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही भाजपचे मन भरलेले नाही. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे.
राहुल गांधी म्हणाले की, सरकारचे धोरण कोण ठरवते? भाजपचे खासदार की पंतप्रधान मोदी? विशेषत: हरयाणा आणि पंजाबमधील ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या बलिदानानेही भाजपाचे समाधान झाले नाही.आमच्या अन्नदात्यांविरुद्ध भाजपचे कोणतेही षड्यंत्र INDIA आघाडी यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले तर मोदी यांना पुन्हा माफी मागावी लागेल. कंगना रणौत यांनी मंगळवारी म्हटले होते की, शेतकरी हा भारताच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. काही राज्यांतच त्यांनी कृषी कायद्यांना विरोध केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कृषी कायदे परत आणण्याचे आवाहन मी हात जोडून करत आहे.
वाद वाढल्यानंतर कंगनाने २०२१ मध्ये रद्द करण्यात आलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचे विधान मागे घेतले. कंगनाने म्हटले की, हे तिचे वैयक्तिक मत असून अशी पक्षाची कोणतीही भूमिका नाही. राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजपचे लोक त्यांच्या विचारांची चाचपणी करत असतात. ते कुणाला तरी जाहीरपणे आपले विचार व्यक्त करण्यास सांगतात आणि मग प्रतिक्रिया काय आहे ते पाहतात. तसे झाले आहे. त्यांच्या एका खासदाराने काळे कृषी कायदे पुन्हा सुरू करण्याची भाषा केली आहे.
मोदीजी तुम्हाला ते कायदे पुन्हा लागू करायचे आहेत का, हे स्पष्ट करा. तुम्ही पुन्हा हे कायदे तर आणणार नाहीत? राहुल गांधींनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी शहीद शेतकऱ्यांसाठी संसदेत दोन मिनिटेही मौन बाळगू दिले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने 'एक्स'वर लिहिले की, 'सरकारचे धोरण कोण ठरवत आहे? भाजपचे खासदार की पंतप्रधान? विशेषत: हरयाणा आणि पंजाबमधील ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या बलिदानाने भाजपाचे मन भरून आले नाही. '