DK Shivakumar Viral Video : विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच कर्नाटकात चांगलंच राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी लोकांवर हजार आणि पाचशेच्या नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकातील श्रीरंगपटना या शहरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या रॅलीत लोकांवर पैसे उधळण्यात आल्यामुळं डीके शिवकुमार वादात सापडण्याची चिन्हं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रजा ध्वनी यात्रा सुरू केली आहे. त्याचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याकडे देण्यात आलं आहे. राज्यातील श्रीरंगपटना या शहरात यात्रा दाखल होताच रॅलीत सहभागी होणाऱ्या लोकांवर डीके शिवकुमार यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा उधळण्यास सुरुवात केली. ते एका वाहनावरून लोकांना हस्तांदोलन करत होते. त्याचवेळी त्यांनी नोटा उधळल्या. त्यानंतर पैसे झेलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली. रॅली संपल्यानंतर डीके शिवकुमार पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.
शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत...
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगलाच जोर लावला आहे. जेडीएससह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारसभांमध्ये उतरले आहेत. यावेळी काँग्रेसनं कर्नाटकात १५० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं असून डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. त्यातच आता त्यांनी लोकांवर नोटा उधळल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या