देशात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जातात. काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आता मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो. निवडणुकीत तर शिवाजी महाराज प्रचाराच्या व राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात केंद्रस्थानी असतात. आता महाराजांचा पुतळा शेजारील मध्य प्रदेशातही उभारला गेला असून २२ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार नकुलनाथ या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहे. हा पुतळा छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे उभारला आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
या कार्यक्रमावर भाजपने टीका केली आहे. कमलनाथ हे मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता. आता त्यांनीच पुन्हा पुतळा उभा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.हा जुना वाद लक्षात घेता मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.