महाराष्ट्रात व झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी उद्या (बुधवार) जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. यामधून जनतेसाठी ५ ते ७ गॅरंटी योजना जाहीर करण्याची शक्यता असतानाच आता झारखंडमध्ये इंडिया आघाडीकडून सात गॅरंटी देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यामध्ये महिलांना २५०० रुपये, गरीब कुटुंबाला ४५० रुपयांत गॅस सिलिंडर आणि ७ किलो रेशन आदी आश्वासने आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-झामुमो-राजद-माकप आघाडीतील घटक पक्षांनी मंगळवारी रांची येथे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला 'एक मत, सात हमी' असे नाव देण्यात आले आहे. ज्यात आघाडीने मतदारांना ७ गॅरंटी देण्याचे आश्वासन दिले आहे.
या हमीमध्ये महिलांना दरमहा २५०० रुपये देणे, ओबीसी (इतर मागासप्रवर्ग) आरक्षण १४ टक्क्यांवरून २७ टक्के करणे, शिधावाटप प्रतिव्यक्ती ७ किलो, कुटुंब विमा १५ लाख रुपये, युवकांना १० लाख रोजगार, पिकांचा हमीभाव वाढविणे, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करणे अशी अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या महिलांना दरमहा १००० रुपये मिळत आहेत ते वाढवून २५०० रुपये करण्यात येणार आहेत. डिसेंबरपासूनच ही रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.
स्थानिक धोरण आणण्याचे, सरणा धर्म संहिता लागू करण्याचे तसेच प्रादेशिक भाषा आणि संस्कृती जपण्याचा संकल्प करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या हमीअंतर्गत डिसेंबर २०२४ पासून 'मैयां सन्मान' योजनेंतर्गत २५०० रुपयांची रक्कम देण्याचे आश्वासन युतीने दिले.
या हमी अंतर्गत एसटी वर्गाला २८ टक्के, एससी वर्गाला १२ टक्के, ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण आणि अल्पसंख्याक वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची हमी देण्यात आली आहे. तसेच मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले.
शिधावाटप प्रति व्यक्ती ७ किलोपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
५ -रोजगार व आरोग्य सुरक्षेची हमी -
झारखंडमधील १० लाख युवक-युवतींना नोकरी आणि रोजगार देण्याचे तसेच १५ लाख रुपयांपर्यंतचा कौटुंबिक आरोग्य विमा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या हमीअंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यात पदवी महाविद्यालये आणि जिल्हा मुख्यालयात अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे तसेच राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये ५०० एकरांचे औद्योगिक पार्क उभारण्याचे आश्वासन औद्योगिक प्रोत्साहन धोरणात देण्यात आले आहे.
या हमीअंतर्गत धानाची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) २४०० रुपयांवरून ३२०० रुपये करण्याबरोबरच लाच, तसर, करंज, चिंचे, महुआ, चिरोंजी, साल बीच आदींच्या आधारभूत किमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे.