पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, केंद्रात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळे विरोधी इंडिया आघाडीला निवडणुकीत यश मिळाले नाही आणि भाजपला बहुमताशिवाय पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली, असा दावाही ममतांनी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात करण्यात आले. यातील एका पुस्तकाचे नाव आहे 'बांगलार निर्बचों ओ आमरा' ('Banglar Nirbachon o Amra'). यामध्ये त्यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर आपले मत मांडले आहे.
भारतीय जनता पक्षाविरोधात एक मजबूत विरोधी आघाडी तयार करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला, ज्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतील. आम्ही सुरुवातीपासूनच किमान समान कार्यक्रम आणि समान जाहीरनामा यावर आग्रही होतो. विरोधी आघाडीचे नावही माझाच प्रस्ताव होता. काँग्रेसला राष्ट्रीय आघाडीचा नेता बनवण्याचा प्रस्ताव होता. पण असे असूनही किमान समान कार्यक्रम किंवा सर्वसाधारण जाहीरनामा नव्हता. युतीचे सदस्य आपापसात निवडणूक लढवत होते. त्याचा फायदा भाजपला झाला आणि बहुमताशिवाय ते पुन्हा सत्तेत येऊ शकले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेवढ्या जागा मिळाल्या, त्या प्रामुख्याने इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळेच मिळाल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी पुस्तकात केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये काँग्रेस आणि माकपप्रणित डाव्या आघाडीतील जागावाटपावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की,भाजपसोबतच्या गुप्त करारानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसविरोधी मोठी आघाडी कार्यरत आहे. ममता बॅनर्जी यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेले यश त्यांच्या सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास कामांनी प्रेरित झालेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळेच मिळाले आहे.
२०२४ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २९ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये ही संख्या २२ होती. भाजपची कामगिरी १२ जागांवर घसरली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे १८ खासदार होते. काँग्रेसला एक जागा मिळाली, तर माकपप्रणित डाव्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
संबंधित बातम्या