सोनिया गांधींवर बोलल्यानं कंगना पुन्हा वादात! माफी न मागितल्यास कोर्टाच्या कचाट्यात अडकणार-congress challenges kangana ranaut to prove claims against sonia gandhi or face legal action ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सोनिया गांधींवर बोलल्यानं कंगना पुन्हा वादात! माफी न मागितल्यास कोर्टाच्या कचाट्यात अडकणार

सोनिया गांधींवर बोलल्यानं कंगना पुन्हा वादात! माफी न मागितल्यास कोर्टाच्या कचाट्यात अडकणार

Sep 23, 2024 06:19 PM IST

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारनं राज्याला मिळालेला निधी सोनिया गांधी यांच्याकडं वळवला आहे, असा आरोप करणाऱ्या खासदार कंगना राणावत फसल्या आहेत. काँग्रेसनं त्यांना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे.

BJP MP Kangana Ranaut (PTI file)
BJP MP Kangana Ranaut (PTI file)

काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्यावर आर्थिक व्यवहारांचे आरोप करणाऱ्या भाजप खासदार कंगन राणावत यांना काँग्रेसनं घेरलं आहे. 'जे काही आरोप केलेत ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असं आव्हानच हिमाचल प्रदेश काँग्रेसनं कंगनांना दिलं आहे.

हिमाचल प्रदेश सरकारनं कर्ज काढून सोनिया गांधी यांना पैसा पोहोचवला आहे, असा आरोप कंगना राणावत यांनी केला होता. त्यामुळं मोठी खळबळ उडाली. हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना कंगनांच्या आरोपांंना उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी कंगना राणावत यांच्यावर सडकून टीका केली.

'कंगना यांनी सोनिया गांधींबद्दल केलेलं वक्तव्य बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. 'विकासकामांसाठी केंद्राकडून राज्याला मिळणारा निधी सोनिया गांधींना दिला जात आहे, असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. मी कंगना राणावतला खुलं आव्हान देतो की, त्यांनी एक रुपयाही वळवल्याचा पुरावा दाखवावा. अन्यथा सोनिया गांधी यांच्यावर निराधार आणि अनावश्यक आरोप केल्याबद्दल माफी मागावी. त्यांनी या आरोपांचे पुरावे न दिल्यास काँग्रेस त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करेल, असा इशारा विक्रमादित्य सिंह यांनी दिला.

चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकल्यामुळं कंगना निराश

कंगना राणावत निराधार वक्तव्य करत आहेत. त्यांचा 'आणीबाणी' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनासाठी वेळेत मंजूर केला नाही म्हणून त्या निराश झाल्या आहेत. त्या नैराश्यातून त्यांनी ही वक्तव्य केली असावीत, असं विक्रमादित्य म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या कंगना राणावत?

'हिमाचल सरकारनं राज्याची तिजोरी पोकळ केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्ज घेतं व सोनिया गांधी यांना देतं. केंद्र सरकारनं कधी आपत्ती निधी दिला तर तो मुख्यमंत्री सहाय्यात निधीत जातो, मात्र तिथून तो सोनिया गांधींकडं वळवला जातो, असा आरोप करत भाजप खासदार कंगना राणावत यांनी केला होता.

Whats_app_banner