लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आता काहीच तासांचा वेळ शिल्लक राहिला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान काँग्रेसने लोकसभा निवडणूक निकालावर चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांनी मंगळवारी सांयकाळी किंवा बुधवारी सकाळी बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतमोजणी झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी INDIA ब्लॉकच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्लीतच राहण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी सांगितले की, शनिवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्टमध्ये म्हटले की, "रिजल्ट घोषित झाल्यानंतर INDIA ब्लॉकचे नेते निश्चितपणे भेटतील " त्यांनी या वृत्तांचे खंडन केले की, जर निवडणुकीचे निकाल विरोधात गेल्यास विरोधक प्रदर्शन करतील.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दावा केला की, ५४३ लोकसभा जागांपैकी २९५ जागा जिंकून इंडिया आघाडी सत्तेत येत आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपने दावा केला आहे की, सलग तिसऱ्यांदा ते सरकार स्थापन करणार आहेत. मतदानानंतर जाहीर झालेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र विरोधकांना या पोलचे आकडे मान्य नाहीत.
न्यूज एजन्सी एएनआयनुसार काँग्रेस सूत्रांनी सांगितले, निकालानंतर INDIA ब्लॉकचे नेते पुढील रणनीतीवर चर्चा करतील. त्याचबरोबर अपक्षेप्रमाणे निकाल न आल्यास अन्य पर्यायांवर चर्चा केली जाईल. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातील. पत्रकार परिषद, राष्ट्रपतींची भेट आदी मुद्द्यांवर विचार केला जाईल. मात्र जयराम रमेश यांनी एक्स पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारचा विरोध प्रदर्शन करणार नसल्याचे म्हटले.
सातव्या व अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारीही INDIA आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली होती. बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दावा केला होता की, इंडिया आघाडी या निवडणुकीत २९५ हून अधिक जागा जिंकणार आहे. INDIA आघाडीला कोणत्या राज्यात किती जागा मिळण्याची शक्यता आहे, यावरही चर्चा झाली होती. मीटिंगमध्ये दावा केला की, इंडिया आघाडी यूपीमध्ये ४० तर महाराष्ट्रात २४ जागा जिंकू शकते.