Viral News : काही दिवसांपूर्वी चीनमधील एक कंपनी चर्चेत आली होती. या कंपनीने तब्बल ७० कोटी रुपयांचा अनोखा बोनस कर्मचाऱ्यांना दिला होता. या कंपनीची जगभरात चर्चा होत असतांना आता जपान मधील एका कंपनीची चर्चा आहे. या कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीच्या या ऑफरची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. मात्र, जपान मधील एका कंपनीने या साठी आणखी चार पावले पुढे टाकलेली दिसते. ही कंपनी ऑफिसमधील लोकांना मोफत दारू पुरवते. इतकंच नाही तर जास्त दारू पिऊन कर्मचाऱ्याला हँगओव्हर झाल्यास पगारी रजा घेण्याची सुविधाही या कंपनीने दिली आहे. जपानमधील ओसाका येथील ही टेक कंपनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलत असतांना दिसत असून कंपनीच्या या पॉलिसीची चर्चा सध्या जगभरात होत आहे.
ऑडिटी सेंट्रलच्या अहवालानुसार, ट्रस्ट रिंग कंपनी लिमिटेड नावाच्या कंपनीने आपलं ऑफिस कल्चर सुधारण्यासाठी अल्कोहोल आणि 'हँगओव्हर लीव्ह' देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे हा त्यांचा या योजनेमागील उद्देश आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी बड्या कंपन्या चांगले पॅकेज देत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, त्यांच्याकडे तेवढा निधी नाही. म्हणूनच त्यांनी ही पद्धत शोधून काढली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कामाच्या ठिकाणचे वातावरण आरामदायी राहावे म्हणून कंपनीचे सीईओ स्वत: आपल्या कर्मचाऱ्यांसोबत मद्यपान करतात. एखाद्या कर्मचाऱ्याला दारूचे व्यसन असेल तर त्याला दारू पिण्यासाठी २-३ तासांची रजा दिली जाते. ट्रस्ट रिंगचे सीईओ म्हणाले की, त्यांनी आपल्या मर्यादित बजेटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. काम आणि आनंद यांच्यात समतोल साधण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या