coalition government will be formed in pakistan : पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीत त्रिशंकू संसदेला जनतेने कौल दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी विजयाचा दावा हा तीन पक्षांनी केला आहे. पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांच्या निवासस्थानी शेहबाज यांनी पीपीपीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. शेहबाज शरीफ यांनी झरदारी यांच्यासोबत भविष्यातील सरकार स्थापनेबाबत चर्चा केली असून पाकिस्तानमध्ये आत त्रिशंकु सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण निकाल येण्याचे बाकी आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात निकाल जाहीर झाले असून तुरुंगात बंद असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
पाकिस्तानच्या जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. दरम्यान, सरकार स्थापणेसाठी तीन पक्षाची बोलणी सुरू झाली आहे. यात पीएमएल-एनचे अध्यक्ष शेहबाज शरीफ यांनी पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेऊन सरकार स्थानप करण्यासाठी पावले उचलली आहेत. केंद्र आणि पंजाबमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यावर आणि पाकिस्तानमध्ये एकत्र काम करण्यावर तिघांमध्ये सहमती झाली आहे.
पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांच्या निवासस्थानी शाहबाज यांनी पीपीपीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शेहबाज शरीफ यांनी झरदारी यांच्याशी भविष्यातील सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आणि पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांचा मेसेजही दिला. शाहबाज यांनी पीपीपीच्या दोन्ही नेत्यांना पाकिस्तानमधील राजकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी पीएमएल-एन पक्षाला एकत्र येण्याचे आवाहन केले.
दरम्यान, झरदारी आणि शहबाज यांनी पंजाब आणि केंद्रात सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्ष पुढील बैठकीत आपले म्हणणे मांडणार आहे. या दरम्यान सत्तावाटपाच्या सूत्राबाबतही चर्चा केली जाणार आहे. नेत्यांची ही बैठक तब्बल ४५ मिनिटे चालली.
या पूर्वी, मॉडेल टाऊनमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवाझ शरीफ यांनी दावा केला की, निवडणुकीत पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शहबाज शरीफ, पीएमएल-एनच्या मुख्य संघटक मरियम नवाज आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.
ते म्हणाले, "देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे. पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वांना आमच्यासोबत यावे, असे आमंत्रण देतो. चला एकत्र बसूया. सर्वांना माहीत आहे की, देशासाठी कोणी काय केले? " तीन वेळा माजी पंतप्रधान म्हणाले की पीएमएल-एनचा ट्रॅक रेकॉर्ड सर्वांनाच माहित आहे आणि या देशाला चक्रीवादळातून बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे.
नवाझ शरीफ म्हणाले, “आम्ही इतर सर्व पक्षांच्या जनादेशाचा आदर करतो. मग तो कोणताही पक्ष असो किंवा अपक्ष. पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यांना आमच्यासोबत बसण्याचे आमंत्रण देतो. समृद्ध पाकिस्तान हा आमचा अजेंडा आहे.”
ते म्हणाले की, सर्व पक्षांनी मिळून आधी देशाचा विचार करणे गरजेचे आहे. राजकारणी, संसद, पाकिस्तानी लष्कर आणि मीडिया या सर्वांनी सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे.
नवाझ शरीफ म्हणाले, "देशाच्या स्थैर्यासाठी किमान १० वर्षांची गरज आहे. पाकिस्तानला यावेळी कोणतेही युद्ध परवडणारे नाही. आपल्याला एकत्र बसून प्रकरणे सोडवावी लागतील."
नवाझ शरीफ यांनी साधे बहुमत नसताना आघाडी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आणि शहबाज शरीफ यांना आसिफ अली झरदारी, फजलुर रहमान आणि खालिद मकबूल सिद्दीकी यांना भेटण्याचे काम सोपवण्यात आले आहे.