
Zero Traffic Protocol In Karnataka : मुख्यमंत्र्यांचा ताफा येत असेल तर त्यासाठी कोणतीही वाहनं थांबवण्याची गरज नाही, तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाल, हार, पुष्पगुच्छ न देता पुस्तक भेट देण्याचे आदेश कर्नाटक सरकारने काढले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून सिद्धरामय्या यांनी धडाकेबाज निर्णयांचा सपाटाच लावला आहे. सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या पाच आश्वासनांची पूर्तता करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरु पोलिसांना एक विषेश आदेश जारी केला आहे. त्यात मुख्यमंत्री अथवा अन्य व्हीआयपी लोकांसाठी असलेला झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल रद्द करण्याच्या सूचना केल्या आहे.
कर्नाटकातील लोकांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेता झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल रद्द करण्याच्या सूचना बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांना केल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मंत्री, नेते आणि कार्यकर्ते यांनी सत्कार करताना फुलं, हार, शाल किंवा पुष्पगुच्छ न आणता केवळ पुस्तकं भेट देण्याचंही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठरवलं आहे. त्यामुळं आता अनेकांनी सिद्धरामय्या यांच्या नव्या निर्णयाचं स्वागत करत कर्नाटक सरकारचं कौतुक करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशातील नेतेमंडळींचं व्हीआयपी कल्चर संपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मंत्री, नेत्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढून घेण्यात आले होते.
कॉंग्रेसने कर्नाटकात बहुमतासह विजय मिळवल्यानंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदी तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. त्यानंतर सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉंग्रेसने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटकातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल रद्द करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहे.
संबंधित बातम्या
