Himachal Pradesh Rain: हिमाचल प्रदेशात बुधवारी रात्री पावसाचा प्रकोप झाला. ढगफुटीमुळे शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांतील वरच्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूर विभागातील झाकरी भागातील समेज खड्डू येथील हायड्रो प्रोजेक्टजवळ मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे गोंधळ उडाला. यामुळे ५० हून अधिक नागरिक बेपत्ता झाले आहे.
मंडी जिल्ह्यातील चोहर खोऱ्यातील तिक्कन थलटू कोडमध्ये, अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर अनेक इमारती पाण्यात वाहून गेल्या. मुसळधार पावसामुळे मलाणा धरण फुटले असून नद्या, नाल्यांपासून दूर राहून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मंडीचे जिल्हा दंडाधिकारी अपूर्व देवगण हे मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्तेही बंद झाले आहेत. रामपूर, शिमला येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. बुधवारी रात्री समेळ खड्डू येथे आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला. गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त अनुपम कश्यप आणि पोलिस अधीक्षक संजीव गांधी हेही रवाना झाले आहेत. एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून ५० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. एसडीएम रामपूर निशांत तोमर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते तुटून पडले आहेत. यामुळे बचाव कार्य राबावन्यासाठी बचाव उपकरणे हातात घेऊन दोन किलोमीटर पायी जावे लागत आहे.
अनुपम कश्यप यांनी सांगितले की, तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आयटीबीपी आणि विशेष होमगार्डच्या तुकडीचाही बचाव पथकात समावेश करण्यात आला आहे. सर्व पथके एकत्रितपणे बचाव कार्य करत आहेत. बचाव कार्यात रुग्णवाहिकेसह सर्व मूलभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये पोलिस, होमगार्ड, अग्निशमन दल, सुन्नी धरण व्यवस्थापन आदी विभागांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीखंड टेकड्यांवर ढगफुटीमुळे आलेला पूर, कुल्लू जिल्ह्यातही नुकसान
कुल्लू जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मलाणा येथील वीज प्रकल्प १ चे धरण फुटले. धरण फुटल्याने रस्ते, पूल आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले. पार्वती नदीला मोठा पूर आल्याने भुंतरच्या आसपासच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लू जिल्ह्यातील बागीपुलमध्ये पुरामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. अनेक घरे वाहून गेली आहेत.
शिमलाच्या रामपूर भागात ज्या भागात पुरामुळे विध्वंस झाला तो कुल्लू जिल्ह्याला लागून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावर ढगफुटीमुळे कुरपण, समेळ आणि गणवी खड्डू येथे भीषण पूर आल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे चित्र आहे. सुमारे दोन डझनहूं अधिक घरे आणि अनेक वाहनेही पुरात वाहून गेल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत आणि दवाखानाही पुरात वाहून गेला आहे. वाहत्या खड्डूने शिमला जिल्ह्यातील गणवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्येही कहर केला आणि श्रीखंडच्या टेकड्यांवरील नैन सरोवराभोवती ढगफुटी झाल्यामुळे तीन खड्डू म्हणजेच लहान नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. मलाणा प्रकल्प धरण २ चेही पुरामुळे नुकसान झाले आहे.
येत्या २४ तासांत राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२७ जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून राज्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. लाहौल-स्पीतीमध्ये सामान्यपेक्षा ७९ टक्के कमी, किन्नौरमध्ये ४९ टक्के, उनामध्ये ४७ टक्के, चंबामध्ये ४५ टक्के, हमीरपूरमध्ये ४१ टक्के, सिरमौरमध्ये ४४ टक्के, सोलनमध्ये ४३ टक्के, बिलासपूर आणि कुल्लूमध्ये ३१ टक्के, १५ टक्के कांगडा मंडीमध्ये १७ टक्के कमी तर शिमल्यात १४ टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यात पावसाळ्यात पाऊस आणि भूस्खलनामुळे ११४ घरांचे नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिली आहे. यातील १९ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ९५ घरांचे अंशत: नुकसान झाले. याशिवाय पाच दुकाने आणि ८७ गोठ्याचेही नुकसान झाले. राज्यात पावसाळ्यात ४३३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे १८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रस्ते अपघातात ६६ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर उंचीवरून घसरून, बुडून, प्रवाह, प्रवाह आणि सर्पदंश यामुळे ६५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी शिमला येथे तातडीची बैठक घेऊन ढगफुटीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सुखूशी बोलून त्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
संबंधित बातम्या