Chitrakoot Donkey Fair News: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिवाळीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यादरम्यान, आपल्या देशात अनेक अनोख्या परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक परंपरा मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मंदाकिनी नदीच्या काठावर पाहायला मिळत आहे, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत गाढवांचा बाजार भरवला जातो. या बाजारात उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील अनेक शहरांतून गाढवे विक्री आणि खरेदीसाठी आणली जातात. या बाजाराची खासियत म्हणजे, या बाजारात चित्रपटातील कलाकारांच्या नावाने गाढवांचा लिलाव केला जातो.
चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा बाजार भरतो, जो पुढील तीन दिवस चालतो. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी बॉलिवूड स्टार सलमान खानच्या नावाच्या गाढवाची ८० हजारांना विक्री झाली. मात्र, या वर्षी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गाढवाने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले. लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गाढवावर तब्बल १ लाख १५ हजारांची बोली लावण्यात आली.
मुघल काळापासून हा बाजार भरवला जात आहे. औरंगजेब जेव्हा चित्रकूटला पोहोचला तेव्हा साहित्य आणि शस्त्रे घेऊन जाणारी गाढवे आणि खेचर आजारी पडू लागले. त्यावेळी कोणीतरी औरंगजेबाला या ठिकाणी गाढवांचा बाजार भरवण्याचा सल्ला दिला. अशा बाजारात चांगल्या जातीची गाढवांची किंमत हजारांपासून तर लाखोपर्यंत असते, असेही म्हटले जात आहे.
मंदाकिनी किनाऱ्यावर दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील पशुधन व्यापारी सहभागी होतात. त्याचबरोबर या जनावरांचे खरेदीदार देशभरातून येतात. येथे पोहोचलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, येथील गाढव चित्रपट कलाकारांच्या नावाने ओळखले जातात. बॉलीवूड कलाकारांची नावे दिल्याने गाढवांची विक्री वाढते, असे या बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे मत आहे.