Lok Sabha Elections 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान आणि कंगना रणौत या दोघांनी मोठा विजय मिळवला आहे. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग हाजीपूरमध्ये ५३.३% मतांनी विजयी झाला. लोक जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधित्व करताना चिराग यांना ६ लाख १५ हजार ७१८ मते मिळाली. तर, भाजपकडून राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या कंगानाने हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून ५ लाख ३७ हजार २२ मतांनी विजय मिळवला. राजकारणी असण्यासोबतच चिराग पासवान हे एक अभिनेते देखील आहेत. मोठ्या पडद्यावर त्यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि आता नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना राणौतसोबत काम केले आहे. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चिराग आणि कंगना यांनी २०११ मध्ये बॉलिवूड चित्रपट 'मिली ना मिले हम' एकत्र काम केले आहे. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटातून चिराग यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि कंगना मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा आणि चक दे इंडिया स्टार सागरिका घाटगे यादेखील होत्या. हा चित्रपट चिरागभोवती फिरतो जो एक चांगला टेनिसपटू आहे. परंतु, त्याला त्याच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळत नाही. त्याऐवजी ते त्याला लग्न करून सेटल होण्याचा आग्रह करतात. त्यावेळी तो घरच्यांना सांगतो की, तो अनिष्काच्या (कंगणा रणौत) प्रेमात आहे आणि तिच्याशीच लग्न करेल. या चित्रपटात चिराग यांचा त्यांच्या पालकांविरुद्धचा संघर्ष टेनिस खेळासाठी असलेली आवड दाखवण्यात आली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत चिराग यांना विचारले असता ते म्हणाले की,'आम्हा दोघांचे एकत्र येणे लोकांना आवडले नव्हते. पण आता आम्ही दोघे एकत्र संसदेत येणार आहोत.' चिरागने कंगना आणि स्वतःबाबत केलेले हे विधान खरे ठरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच चिरागने स्वतःच्या आणि कंगनाच्या विजयाचा दावा केला होता.
चिराग यांच्या पक्षाने बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या आहेत, जे भाजपच्या नेतृत्वाखालील एडीएअंतर्गत येतात. चिराग यांनी आरजेडीच्या शिवचंद्र राम यांचा १ लाख ७० हजार १०५ मतांनी पराभव केला आहे. कंगना राणौतने हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.कंगनाने काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य यांचा सुमारे ७५ हजार मतांनी पराभव केला.