China Will built world big dam in Tibet : चीनने तिबेटवरील आपली वज्रमूठ आणखी आवळली आहे. येथे आपले स्थान मजबूत करण्यासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. चीनने या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास मंजूरी दिली असून या धारणावर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. चीनच्या या प्रकल्यामुळे भारत आणि बांग्लादेशचं टेंशन वाढणार आहे.
रिपोर्टनुसार, चीनच्या तिबेटच्या पूर्व भागाशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजनेचा हा भाग आहे. चायना पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशननुसार ब्रह्मपुत्रा नदीच्या खालच्या भागात हे धरण बांधले जाणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यारलुंग झांगबो म्हणून ओळखले जाते, जिथे चीनने हे धरण बांधण्याची योजना आखली आहे. मात्र, या धरणाचा फटका भारत आणि बांगलादेशातील लाखो नागरिकांना बसणार आहे.
चीनच्या अंदाजानुसार या धरणातून वर्षाकाठी ३०० अब्ज किलोवॅट वीजनिर्मिती होऊ शकते. सध्या मध्य चीनमध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या थ्री गॉर्जेस धरणाच्या ८८.२ अब्ज किलोवॅट क्षमतेपेक्षा या धरणाची विज निर्मितीची क्षमता ही तिप्पट राहणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन आणि कार्बन न्यूट्रॅलिटी, व अभियांत्रिकीसारख्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणार असून तिबेटमध्ये रोजगार निर्मिती देखील या प्रकल्पामुले केली जाऊ शकते. चीनच्या तिबेटमधील विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असे वृत्त चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने बुधवारी दिले. या धरणाच्या बांधकामाचा खर्च थ्री गॉर्जेस धरणापेक्षा जास्त राहणार आहे. या धरण बांधणीचा खर्च खर्च सुमारे ३४.८३ अब्ज डॉलर्स इतका आहे.
ब्रह्मपुत्रा नदीचा काही भाग ५० किलोमीटरच्या थोड्या अंतरावर तब्बल २००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर आहे. त्यामुळे जलविद्यु प्रकल्प तयार करण्यासाठी ही चांगली जागा आहे. मात्र, हा प्रकल्प झाल्यास भारत व बांगलादेशचे मोठे नुकसान होणार आहे. या धरणाबाबत दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे केवळ स्थानिक परिसंस्थेचेनुकसान होणार नाही, तर नदीच्या प्रवाहात आणि दिशेतही बदल होऊ शकतो. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा तिबेटमध्ये होतो. यानंतर ही नदी भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमधून दक्षिणेकडे वाहते आणि शेवटी बांगलादेशमार्गे बंगालच्या उपसागराला मिळते.
या प्रकल्पासाठी किती तिबेटींना विस्थापित व्हावे लागेल, याचा तपशील चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप दिलेला नाही. या धरणाचा तिबेटमधील सर्वात श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण पठारांवर आणि तेथील पर्यावरणावर काय परिणाम होईल, हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिबेटमधील जलविद्युत प्रकल्पांचा पर्यावरणावर किंवा भारत आणि बांगलादेशसारख्या देशांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही.
संबंधित बातम्या