kumara dissanayake new president of sri lanka : आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे आता ते ते अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे.
मतमोजणीची आकडेवारी हाती येईपर्यंत दिसानायके ५४ टक्के मतांसह बहुमताकडे वाटचाल करत होते. दिसानायके हे श्रीलंकेचे १० वे राष्ट्रपती राहतील. गोटाबाया राजपक्षे यांच्या हकालपट्टीनंतर अध्यक्षपदी विराजमान झालेले रानिल विक्रमसिंघे यांचा पक्ष निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या.
दिसानायके हे कोलंबोचे खासदार आहेत. ते नॅशनल पीपल्स पार्टी आणि जेव्हीपी पक्षाचे नेतृत्व करतात. ते कायम भारत विरोधी राहिले आहेत. ते चीन समर्थक मानले जातात. २०२२ मध्ये श्रीलंकेच्या आर्थिक आणि राजकीय संकटानंतर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि गरिबांचा मसिहा आणि भ्रष्टाचारविरोधी नेता अशी त्यांची प्रतिमा मजबूत झाली. २०२१९ मध्ये देखील त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. मात्र, त्यांना या निवडणुकीत अपयश आले होते
मार्क्सवाद आणि लेनिनवादाकडे दिसानायके यांचा कल लक्षात घेता ते भारतविरोधी पावले उचलू शकतात, असे बोलले जात आहे. भारत-श्रीलंका शांतता कराराद्वारे श्रीलंकेच्या गृहयुद्धात भारताच्या हस्तक्षेपाला त्यांनी विरोध केला होता. अलीकडेच त्यांनी अदानी समूहाचा ४८४ मेगावॅटचा श्रीलंकेतील ४४४ कोटींचा करार रद्द करण्याबाबतही भाष्य केले होते. ते अध्यक्ष झाल्यानंतर हा प्रकल्प रद्द केला जाईल, असे त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते.
दिसानायके यांच्या पक्षाचे संसदेत केवळ तीन नेते आहेत. त्यांचा पक्ष चीनच्या अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेपाचे समर्थन करतो. याशिवाय बंद बाजाराच्या आर्थिक धोरणावर देखील त्यांचा विश्वास आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटासाठी चीनलाही जबाबदार मानले जात होते. चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकल्यानंतर श्रीलंकेची अवस्था बिकट झाली. त्याचबरोबर वाईट काळात चीनने मदतीसाठी हात देखील पुढे केला नाही.
रानिल विक्रमसिंघे यांचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विजयाबद्दल दिसानायकेचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, प्रदीर्घ प्रचारानंतर आता निवडणुकीचे निकाल स्पष्ट आले आहेत. मी जनादेशाचा आदर करतो. गेल्या निवडणुकीत दिसानायके यांच्या पक्षाला केवळ तीन टक्के मते मिळाली होती. यावेळी त्यांनी भ्रष्टाचार हा मुद्दा बनवला आणि श्रीलंकेचे नशीब बदलण्याचे स्वप्न दाखवून ते लोकप्रिय झाले.