चीनने रविवारी आपल्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या अद्ययावत मॉडेलची चाचणी घेतली. चाचणी दरम्यान त्याचा वेग ताशी ४५० किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचा दावा रेल्वेच्या निर्मात्याने केला आहे. अशा प्रकारे ही जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेन बनली आहे.
चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनीच्या (चायना रेल्वे) म्हणण्यानुसार, नवीन मॉडेल सीआर ४५० प्रोटोटाइप म्हणून ओळखले जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल. याशिवाय कनेक्टिव्हिटीही सुधारेल, ज्यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर होईल. सीआर ४५० प्रोटोटाइपने ताशी ४५० किलोमीटर चाचणी वेग नोंदविला.
सध्या सेवेत असलेल्या सीआर ४०० फुक्सिंग हाय स्पीड रेल (एचएसआर) पेक्षा ही अधिक वेगवान आहे, जी ताशी ३५० किमी वेगाने धावते, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, चीन रेल्वे प्रोटोटाइपसाठी लाइन टेस्टची मालिका घेईल. तसेच, तांत्रिक इंडिकेटर्स ऑप्टिमाइझ केले जातील. यामुळे सीआर ४५० चा वापर लवकरात लवकर व्यावसायिक सेवेसाठी होईल. ताज्या आकडेवारीनुसार, चीनचे ऑपरेशनल एचएसआर ट्रॅक सुमारे ४७,००० किलोमीटरपर्यंत पोहोचले आहेत, जे देशातील प्रमुख शहरांना जोडतात.
एचएसआर नेटवर्कच्या विस्तारावर भर दिला जात आहे. एचएसआर नेटवर्कच्या विस्ताराने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रवासाचा वेळ कमी झाला असून रेल्वे मार्गावरील औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. अंतर्गत सर्वेक्षणानुसार बीजिंग-शांघाय रेल्वे सेवा सर्वात फायदेशीर आहे.
इतर शहरांमधील नेटवर्क अद्याप आकर्षक झालेले नाही. अलीकडच्या काळात चीनच्या एचएसआरने थायलंड आणि इंडोनेशियाला नेटवर्क निर्यात केले आहे. बेलग्रेड-नोवी सॅड एचएसआर सर्बियामध्ये तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे चीनच्या सरकारकडून रेल्वेच्या विकासावर खूप भर दिला जात आहे, जेणेकरून विकास वेगाने चालवता येईल.
संबंधित बातम्या