China new virus: कोरोना विषाणूच्या संकटातून जग सावरत नाही तोच आता चीनमध्ये नवा व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे आता भारतासह जगाचं टेंशन वाढलं आहे. भारत सरकार देखील सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत बैठक बोलावली होती. सध्या चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेलाही या विषाणूच्या स्थितीबाबत अचूक माहिती देण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातदेखील आरोग्य विभाग अलर्ट झाला असून अनेक सूचना आरोग्य यंत्रांना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या बाबत निवेदन जारी करून लोकांना मेटान्यूमोव्हायरसबद्दल माहिती दिली. तसेच या विषाणू बाबत काळजी करण्याची गरज नाही, असे देखील मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्र सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या विषाणूबंधितांची वाढ चीनमध्ये झाली आहे. चीनमध्ये या विषाणूबाधितांची वाढणारी संख्या चिंतेची बाब आहे. अलीकडच्या काळात रुग्णांमध्ये झालेली वाढ प्रामुख्याने इन्फ्लूएंझा व्हायरस, आरएसव्ही आणि एचएमपीव्ही विषाणू आहेत, जे सामान्य विषाणू आहेत. सध्या थंडीच्या वातावरणात या विषाणूचा प्रभाव जास्त जाणवतो व नागरिक सर्वाधिक या विषाणूमुळे बाधित होतात. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा देखील संतर्क असून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
मंत्रालयाने सांगितले की, आम्ही सर्व मुख्य रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली आहे. सध्या देशात या विषाणूबाधितांची कोणतीही केस आढळलेली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयसीएमआरला एचएमपीव्ही विषाणूच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास वर्षभर या विषाणू बाबत सावध व सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. देशात सुरू असलेल्या तयारीबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालयाचे अधिकारी डॉ. अतुल गोयल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, चीनमध्ये सध्या परिस्थिती सामान्य आहे. कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त हवेतून पसरणाऱ्या विषाणूंपासून सावध राहण्याची गरज आहे.
डॉ. गोयल म्हणाले की, चीनमधून पसरणारा विषाणू हा सर्दीचा सामान्य विषाणू आहे. आरोग्य मंत्रालयाने देशभरातील आरोग्यविषयक आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येचे ही विश्लेषण केले आहे. अद्याप तरी काही ही समस्या नाही. सर्व काही ठीक आहे. ते म्हणाले की, अशा थंडीत या विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आमचे रुग्णालये व संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे.
नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारीबाबत अधिकाऱ्यांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयांना सतर्क राहण्यास देखील सांगितलं आहे. चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा तऱ्हेने इतर देशांसह भारतातही आरोग्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिल्लीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत आतापासूनच पूर्ण तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा सामना करण्यासाठी आवश्यक तयारीबाबत अधिकाऱ्यांनी सूचना जारी केल्या असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. इन्फ्लूएंझासदृश आजार (आयएलआय) आणि श्वसन संसर्ग (एसएआरआय) च्या गंभीर प्रकरणांची माहिती आयएचआयपी पोर्टलद्वारे त्वरित देण्याचे निर्देश रुग्णालयांना देण्यात आले आहेत.