जेव्हापासून इंटरनेटने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे, तेव्हापासून रील्स बनवणे, सेल्फी काढणे, व्लॉग काढणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. स्वत:ला व्हायरल करण्याच्या वेडात लोक काहीही करतात. त्यासाठी दुसऱ्याचा किंवा स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला तरी पर्वा करत नाहीत. रील बनवताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला ट्रेनला लटकून रिल बनवत असताना ती झाडावर आदळून ट्रेनमधून खाली पडते. महिलेसोबत काय घडलं, जाणून घेऊया बातमीत...
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी श्रीलंकेतील एका ट्रेनमध्ये ही घटना घडली. ही महिला चीनमधून श्रीलंकेत पर्यटनासाठी आली होती. रेलिंगला पकडून ती व्हिडिओ बनवत आहे. ती ट्रेनच्या दारात लटकताना दिसत आहे. अचानक तिचे डोके काही झाडांच्या फांद्यांवर आदळते आणि तिचा हात रेलिंगवरून सुटतो. ही महिला काही क्षणातच ट्रेनमधून खाली पडते. या भीषण घटनेनंतर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीआणि आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे लोक ट्रेन थांबवण्यासाठी आरडाओरडा करतात.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली तेव्हा काही सहप्रवासी महिलेच्या मदतीसाठी अपघातस्थळी परत आले. रेल्वेतून खाली पडल्यानंतर सुदैवाने ती झुडपावर पडली आणि बचावली. यात महिला किरकोळ जखमी झाली. लोकल पोलिसांनी गाड्यांमधील प्रवाशांना नेहमी आपल्या सभोवतालच्या परिसराकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महिलेसोबत घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "श्रीलंकेच्या कोस्टल रेल्वे लाईनवर प्रवास करताना एका चिनी पर्यटकासोबतचा हृदयद्रावक क्षण. व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात ती झाडाच्या फांदीवर आदळून ट्रेनमधून खाली पडली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सुदैवाने ती झुडपावर पडली. त्यामुळे तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक युजर्स या महिलेच्या कृतीवर टीका करत आहेत की, त्यापैकी एकाने केवळ रील बनवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातल्याबद्दल महिलेला फटकारले आहे.
संबंधित बातम्या