Children Born Citizenship Continue in US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. जन्माने नागरिकत्व देणारा कायदा रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्तींनी ने ट्रम्प यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. डेमोक्रॅटिक शासित चार राज्यांच्या याचिकेवर विचार करून अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश जॉन कौफेनॉर यांनी ट्रम्प प्रशासनाला त्यांच्या या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. ट्रम्प यांनी आपला दुसरा कार्यकाळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २० जानेवारी रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली होती.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांनी नुकतीच अमेरिकेचे ४७ राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी अमेरिकन प्रशासनाला जन्माने नागरिकत्व कायदा रद्द करण्याचे आदेश दिले होते. यामुळे लाखो भारतीयांसह जगातील अनेक देशांच्या नागरिकांना याचा फटका बसला होता. या आदेशा विरोधात अमेरिकेतील काही राज्य हे कोर्टात गेले होते. यानंतर यावर सुनावणी करतांना हा निर्णय स्थगित करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
हा आदेश घटनात्मक आहे, असे कोणतेही कायदेतज्ज्ञ कसे म्हणू शकतात, हे मला समजत नाही, असे न्यायमूर्ती कौफेनोर यांनी म्हटलं आहे. हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. हा स्पष्टपणे घटनाबाह्य आदेश आहे, असे देखील न्यायाधीश यांनी म्हटलं आहे.
वॉशिंग्टन, अॅरिझोना, इलिनॉय आणि ओरेगॉन सारख्या डेमोक्रॅटिक शासित राज्यांनी दावा केला आहे की, ट्रम्प यांचा हा आदेश अमेरिकेच्या राज्यघटनेतील १४ व्या दुरुस्तीत दिलेल्या नागरिकत्वाच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिकेत जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती या देशाची नागरिक आहे.
अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (एसीएलयू), स्थलांतरित संघटना आणि एका गर्भवती महिलेने ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात खटला दाखल केला होता. यामुळे शपथ घेताच ट्रम्प यांची मोठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. या खटल्यांमध्ये ट्रम्प यांच्या आदेशाला आव्हान दिले जात आहे. दरवर्षी अशा सुमारे दीड लाख मुलांना अमेरिकेत नागरिकत्व मिळते.
मॅसेच्युसेट्सचे अॅटर्नी जनरल अँड्रिया जॉय कॅम्पबेल यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा अधिकार नाही.
ट्रम्प यांच्या या आदेशानंतर अनेक भारतीय जोडपी अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याच्या घाईत वेळेआधीच मुले जन्माला घालण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. अनेक भारतीय गर्भवती महिलांनी २० फेब्रुवारीपूर्वी सी-सेक्शनसाठी रुग्णालयात अपॉइंटमेंट देखील घेतली होती.
संबंधित बातम्या