मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आईच्या मैत्रिणीची कॅरम बोर्ड तोडल्यामुळे चिमुकल्याला बेदम मारहाण, यकृत फुटल्याने मृत्यू

आईच्या मैत्रिणीची कॅरम बोर्ड तोडल्यामुळे चिमुकल्याला बेदम मारहाण, यकृत फुटल्याने मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 09:04 PM IST

कॅरम बोर्ड फोडल्यामुळे एका महिलेने मैत्रिणीच्या मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये यकृत फुटल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू
मुलाचा मृत्यू

NCR मधील साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या परिसरात एका महिलेने कॅरम बोर्ड तोडल्यानंतर तिच्या मैत्रिणीच्या चार वर्षांच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे मुलाचे यकृत फुटल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुलाची आई पतीपासून वेगळी राहते. पतीने पत्नी आणि तिच्या मैत्रिणीवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून साहिबाबाद पोलिस ठाण्यात आई आणि तिच्या मैत्रिणीविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिबादच्या एसीपी पूनम मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी महिला ज्योतीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. 

मुलाचे वडील अरुण दिल्लीचे रहिवासी असून मोबाईल रिपेअरिंगचे काम करतात. २०१० मध्ये सीमापुरी येथील पायलसोबत त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने मृत्यू झाला होता. ६ जानेवारी २०२० रोजी त्याची पत्नी पायल मुलाला घेऊन पतीपासून विभक्त झाली. त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरू आहे. २३ जानेवारी रोजी न्यायालयात गेले त्यावेळी त्यांना त्यांचा चार वर्षांचा मुलगा दिसला होता. तो एकदम बरा होता.

अरुण यांनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटलमधून डॉक्टरांचा फोन आला की, त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ते रुग्णालयात पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता. पत्नी पायल आणि तिची मैत्रिण ज्योती यांनी मिळून आपल्या मुलाची हत्या केल्याचा अरुणचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोटावर लाथ मारून यकृत फाटल्याने निष्पापाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पत्नी पायलने पोलिसांना सांगितले की, आपण मुलाला मैत्रिणीकडे सोडले होते. मुलाने कॅरम फोडले. यानंतर संतापलेल्या ज्योतीने त्याला बेदम मारहाण केली. मुलाने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  याप्रकरणी महिलेच्या पतीने साहिबाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला ज्योतीला अटक करण्यात आली आहे. ज्योतीला तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

WhatsApp channel

विभाग