viral news : हैदराबादमधून एक धक्कादायक आणि वेदनादायी घटना समोर आली आहे. एकाच वेळी तीन पुऱ्या खाल्ल्याने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान विद्यार्थ्याने एकाच वेळी तीन पुऱ्या खाल्ल्या. या पुऱ्या श्वसननालिकेत जाऊन अडकल्याने त्याचा जीव गुदमरला. दरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मुलाला दावखण्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी हा सहावीत शिकत होता. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना शाळेतून फोन आला की त्यांच्या मुलाने एकाच वेळी तीनपेक्षा जास्त पुऱ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत असून तो चक्कर येऊन पडला. या मुलाला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार करून त्याला आणखी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका ३३ वर्षीय महिलेचा मोमोज खाल्ल्याने मृत्यू झाला होता. गाडीवर मोमोज खाल्लेले सर्व नागरिक आजारी पडले होते. दरम्यान, महिलेला हे मोमोज खाऊन विषबाधा झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हा दुकानदार अन्न सुरक्षा परवाना नसताना मोमोज तयार करत करून त्याची विक्री करत असल्याचं आढळलं. तसेच ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचं निदर्शनास आलं. मोमोजमध्ये वापरले जाणारे पीठ पॅकिंग न करता फ्रीजमध्ये ठेवले होते. याशिवाय फ्रीजचा दरवाजाही तुटला होता. स्टॉल लावणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.