नवविवाहित जोडप्यांनी १६-१६ मुले जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवविवाहित जोडप्यांनी १६-१६ मुले जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या!

नवविवाहित जोडप्यांनी १६-१६ मुले जन्माला घालावी; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या!

Oct 21, 2024 02:43 PM IST

MK Stalin: मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मुलांना जन्माला घालण्याबाबत केलेल्या वक्तव्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

नवविवाहित जोडप्यांनी १६ मुले जन्माला घाला, मुख्यमंत्र्याचे वक्तव्य
नवविवाहित जोडप्यांनी १६ मुले जन्माला घाला, मुख्यमंत्र्याचे वक्तव्य (shutterstock)

Tamil Nadu News: सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारताने यापूर्वीच चीनला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक कार्यक्रम राबवले जात असताना तामिळनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मुलांना जन्माला घालण्याबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नवविवाहित दाम्पत्यांना १६-१६ मुले जन्माला घालावीत, असे त्यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.

चेन्नई येथे हिंदू धार्मिक आणि एंडॉवमेंट बोर्डाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टालिन यांनी हे वक्तव्य केले, जिथे मुख्यमंत्री स्टालिन यांच्या उपस्थितीत ३१ जोडप्यांनी लग्न केले. यावेळी स्टालिन म्हणाले की, 'पूर्वीचे लोक नवविवाहित जोडप्यांना १६ प्रकारची संपत्ती मिळवण्यासाठी आशीर्वाद द्यायचे. परंतु, आता १६ प्रकारची संपत्ती मिळण्याचा आशीर्वादाऐवजी १६ मुले जन्माला घालण्याचा आशीर्वाद देण्याची वेळ आली आहे. पूर्वी सांगण्यात येणारी १६ संपत्ती म्हणजे गाय, घर, पत्नी, संतान, शिक्षा, जिज्ञासा, ज्ञान, अनुशासन, भूमी, जल, आयु, वाहन, सोना, संपत्ती, धान्य आणि प्रशंसा होती. याचे रुपांतर आता शिक्षण, जिज्ञासा, ज्ञान, शिस्त, जमीन, पाणी, वय, वाहन, सोने, संपत्ती, पीक आणि स्तुती या स्वरूपात करण्यात आले. पण आता १६ प्रकारची संपत्ती मिळविण्यासाठी कोणीही आशीर्वाद देत नाही. त्याऐवजी, फक्त मुले होण्याचा आणि समृद्ध जीवन जगण्याचा आशीर्वाद देत आहेत.'

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?

यापूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वाढत्या वृद्धत्वाबाबत चिंता व्यक्त केली. या संदर्भात वाढत्या चिंतेचा हवाला देत त्यांनी दक्षिणेकडील राज्यांतील कुटुंबांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश राखण्यासाठी प्रदेशातील तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज नायडू यांनी व्यक्त केली. 'दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात यासाठी कायदा आणण्याची सरकारची योजना आहे,' नायडू यांनी जाहीर केले.

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे ज्यामध्ये जगाच्या लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोकसंख्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अंदाजानुसार, एप्रिल २०२३ च्या अखेरीस १,४२५,७७५,८५० लोकसंख्येसह भारताने जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला मागे टाकले आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर