boat sinking in mahanadi : रायगड जिल्ह्यातील महानदीत आज सकाळी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ७ जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. ही घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली. बोटीत तब्बल ५० जण प्रवास करत होते. दरम्यान, सकाळ पासून महानदीमध्ये बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे.
नदीत बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी भुवनेश्वरमधील स्कूबा डायव्हर्सचे पथक गोताखोरांसह शोधकार्यात गुंतले आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास पिंकू राठिया या मुलाचा मृतदेह सापडला. हे सर्वजण अंजोरीपाली खरसिया गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओडिशाच्या ओडीआरएफ आणि फायर इमर्जन्सीच्या स्कूबा डायव्हर्सद्वारे बचाव कार्य करत असून त्यांना आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशाच्या पाचगाव येथील पाथरसेनी मंदिरात एका बोटीतून सुमारे ५० लोक दर्शनासाठी गेले होते. हे सर्वजण बोटीतून प्रवास करत असतांना अचानक महानदीच्या पात्रात बोट बुडल्याने ८ जणांचा बुडून मृत्यू झाला .
या घटनेत बुडून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राधिका राठिया, केसरबाई राठिया, लक्ष्मी राठिया, बालक कुणाल राठिया, बालक नवीन राठिया यांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेतील ८ पैकी ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर बेपत्ता व्यक्तिंचा शोध सुरू आहे. हे सर्व लोक छत्तीसगडच्या खरसिया विधानसभा मतदारसंघातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर छत्तीसगड सरकारचे अर्थमंत्री आणि रायगडचे आमदार ओपी चौधरी म्हणाले की, रायगडमधील या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना ओडिशातील आहे. जिथे रायगड भागातील ५० लोक बोटीतून दर्शनासाठी जात होते. यावेळी बोट उलटल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका बेपत्ता नागरिकाचा शोध सुरू आहे. मंत्री चौधरी म्हणाले की, सर्व अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. ओडिशा सरकारने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
संबंधित बातम्या