Chhattisgarh News: छत्तीसगडच्या रायपूर येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जन्मदात्या पित्याने खेळताना भांडणाऱ्या पोटच्या दोन मुलींना बेदम मारहाण केली. या घटनेत एकीचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. ही घटना जंजगीर-चांपा येथील भोजपूर रेल्वे गेटजवळ शनिवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीशा परवीन (वय, ८) आणि अलिना परवीन (वय, ६) या दोन बहिणी शनिवारी रात्री घरात खेळत होत्या. मात्र, दोघींमध्ये खेळण्यावरून भांडण झाले. त्यांचा आवाज ऐकून आरोपी सलमान परवीन संतापला. त्याने कशाचाही विचार न करता दोन्ही मुलींना काठीने मारहाण केली. ज्यामुळे दोन्ही मुली जमिनीवर पडल्या आणि बेशुद्ध झाल्या. यानंतर घरच्या सदस्यांनी दोघींनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी एकीला मृत घोषित केले. तर, दुसऱ्या मुलीला रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटार गॅरेजमध्ये काम करत असून त्याला आमली पदार्थांचे व्यसन आहे. तो नेहमीच दारुच्या किंवा गांजाच्या नशेत असायचा. या नशेतच त्याने हा गुन्हा केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तो काहीच बोलू शकला नाही. शेजाऱ्यांनी सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत नेहमीच मुलींना मारहाण करत असे. आरोपीच्या व्यसनाला वैतागून त्याची पत्नी त्याला आधीच सोडून गेली.
झारखंडमधून बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीला वासनेचा शिकार बनवली. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चतरा जिल्ह्यातील कुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील कुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी आहेत. आरोपीने यापूर्वीही पत्नीची हत्या केली होती. आईच्या हत्येनंतर पीडितेच्या काकांनी तिचा सांभाळ केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.