जमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर

जमिनीवर तलावासारखा खड्डा अन् झाडावर जाऊन अडकली पोलीस व्हॅन, छत्तीसगड हल्ल्याचे भयानक फोटो आले समोर

Jan 06, 2025 05:33 PM IST

छत्तीसगडमधील अति नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. माओवाद्यांनी सैनिकांनी भरलेले वाहन उडवून दिले आहे. या हल्ल्यातील घटनास्थळाचे अंगाचा थरकाप उडवणारे फोटो समोर आले आहेत.

Iघटनास्थळी पडलेला खड्डा
Iघटनास्थळी पडलेला खड्डा

Naxal attack In chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांचे वाहन आयईडी स्फोटाने उडवून दिले. या हल्ल्यात ९ जवान शहीद झाले आहेत. विजापूरमधील कुटरू रोडवर हा हल्ला झाला. हा आयईडी स्फोट इतका जबरदस्त होता की, जमिनीवर तलावासारखा खड्डा पडला असून गाडी उडून झाडावर अडकली आहे. गाडीच्या भागांचा चुराडा झाला आहे. 

सुरक्षा दलांच्या अलीकडील धडक कारवायांमुळे बिधरलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी विजापूरमधील कुटरू रस्त्यावर बेद्रेला जाताना आयईडी बॉम्ब ठेवला होता. त्यावरून कार येताच जोरदार स्फोट झाला. कारमध्ये असलेल्या जवानांचे मृतदेह छिन्नविछिन्न पडले. घटनास्थळी खोल खड्डा पडला होता. कारचे अनेक भाग शेकडो मीटर अंतरापर्यंत विखुरलेले होते. एक भाग झाडावर लटकलेला होता.

घटनास्थळावरील दृष्य
घटनास्थळावरील दृष्य

शहीद जवानांमध्ये डीआरजीचे ८ जवान आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. हे सर्व जवान ३ जानेवारीला नक्षलविरोधी मोहिमेवर गेले होते, तर ४ जानेवारीला पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दंतेवाडा डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाले. दोन दिवसांपूर्वी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. या सर्च ऑपरेशनमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण ५ गणवेशधारी नक्षलवादी ठार झाले.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेडसी पीएलजीए प्लाटून क्रमांक ३२ च्या वरिष्ठ कॅडरचा समावेश आहे. या कारवाईत एके ४७, एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीनंतर जवान दंतेवाडाकडे परतत असताना नक्षलवाद्यांनी पिकअप गाडीला आयईडीने स्फोटाने उडवून लावले. 

नक्षलवाद्यांनी हल्ला केलेल्या वाहनामध्ये २० जवान होते. घटनेच्या माहितीनंतर बीजापूरचे एसपी जितेंद्र यादव घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

आधी नक्षलवादी नंतर हेड कॉन्स्टेबल बनलेले झाले शहीद - 

या चकमकीत डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाले. ते आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी होते. २०१७ मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले. २०१९ मध्ये ते जिल्हा राखीव रक्षक (DRG) मध्ये रुजू झाले. यानंतर ते सतत अनेक चकमकींमध्ये सहभागी झाले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर