चेन्नई येथील सर्माऊंट लॉजिस्टिक्स सोल्युशन्स (Surmount Logistics Solutions) या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता म्हणून कार, मोटारसायकल आणि स्कूटर भेट म्हणून दिली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे २० कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना भेट देण्यात आलेल्या वाहनांमध्ये टाटाची टियागो कार, होंडाची अॅक्टिव्हा स्कूटर आणि रॉयल एनफिल्डची बुलेट ३५० आदि गाड्यांचा समावेश आहे.
कंपनीने भेट दिलेल्या वाहनांमध्ये टाटा टियागोचा समावेश आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तर रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० आहे, ज्याची किंमत १.९८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तिसरी भेट म्हणजे होंडा अॅक्टिव्हा स्कूटर, ज्याची सुरुवातीची किंमत ७६,६८४ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डेन्झिल रायन यांनी यावेळी सांगितले की, कर्मचाऱ्यांना प्रेरित ठेवणे हा कर्मचारी कल्याण कार्यक्रमाचा एक भाग आहे. यामुळे त्यांचे समाधान तर वाढतेच, शिवाय उत्पादकता, कनेक्टिव्हिटी आणि स्टेबिलिटी सुधारते.
भारतात सणासुदीला, विशेषत: दिवाळीत कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कामाबद्दलचा उत्साह वाढतो.
हरयाणातील एका फार्मास्युटिकल कंपनीने दिवाळीत आपल्या सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांना १५ एसयूव्ही भेट म्हणून दिल्या होत्या.
चेन्नईतील टीम डिटेलिंग सोल्युशन्स या कंपनीने यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना २८ कार आणि २९ मोटारसायकली भेट म्हणून दिल्या आहेत.
तामिळनाडूतील एका चहाच्या बागेने आपल्या कर्मचाऱ्यांना १५ रॉयल एनफिल्ड मोटारसायकली भेट म्हणून दिल्या होत्या.
सुरतमधील हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी २०१५ मध्ये दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना ४९१ कार आणि २०० फ्लॅट भेट म्हणून दिले होते. २०१६ मध्ये त्यांनी १,२६० कार गिफ्ट केल्या होत्या. २०२३ मध्ये हरे कृष्णा एक्सपोर्ट्स या त्यांच्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुमारे ६०० कार डिलिव्हरी केल्या. एवढेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या सुपूर्द केल्या.
कंपनीच्या अशा पावलांमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक तर होतेच, शिवाय कामाप्रती त्यांची निष्ठा आणि समर्पणही वाढते. यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता तर वाढतेच, शिवाय त्यांचे आणि कंपनीचे नातेही दृढ होते.
संबंधित बातम्या