Kuno Cheetah Death : कुनोत आणखी एका चित्त्याने प्राण सोडले; नामिबीयातून आणलेले ९ चित्ते मृत्युमुखी
Cheetah Found Dead at Kuno National Park: गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांमुळे आत्तापर्यंत एकूण नऊ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नामिबायातील जंगलातून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एकाचा आज सकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात घडली आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांमुळे आत्तापर्यंत एकूण नऊ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्युमुखी पडलेल्या मादी चित्त्याचे नाव तिब्लिसी असं आहे. या चित्त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळलेलं नसून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्यातील सूत्रांनी दिली.
ट्रेंडिंग न्यूज
कुनो राष्ट्रीय अभयारण्यात देखरेखीखाली बंदिस्त आवारात सध्या एकूण १४ चित्ते आणि एक बछड्याला ठेवण्यात आले आहे. यात सात नर तर सहा मादींचा समावेश आहे. या ठिकाणी प्राण्यांची देखभाल आणि आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पशुवैद्यक अधिकारी आणि नामिबीयाहून आलेल्या एका तज्ञाचा समावेश आहे. येथे बंदिस्त कुंपणाच्या आवारात ठेवण्यात आलेले सर्व चित्ते निरोगी असल्याचं अभयारण्यातील सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, यापैकी दोन मादी चित्ते खुल्या जंगलात फिरण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी सोडण्यात आले होते. त्यापैकी एका मादी चित्त्याचा आज सकाळी मृत्यू झाला आहे.
नऊ चित्त्यांचा झाला मृत्यू
मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात ठेवण्यात आलेल्या एकूण २४ पैकी नऊ चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यात तीन बछड्यांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून एकूण २० चित्ते आणले गेले होते. त्यानंतर भारतात आल्यावर चार बछड्यांचा जन्म झाला होता.
दरम्यान, नामिबीयातून आणलेल्या या चित्त्यांचा एका पाठोपाठ एक मृत्यू होत असल्याने भारतातील चित्ता संवर्धन आणि केंद्र सरकारच्या चित्ता स्थलांतरण मोहिमेला मोठा झटका लागला आहे. नामिबीयातून भारतात चित्ते आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजत गाजत या चित्त्यांना कुनो येथील अभयारण्यात सोडले होते. एकूण नऊ चित्त्यांच्या लागोपाठ मृत्युमुळे केंद्राची ही योजना फसणार तर नाही, अशी शंका सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात उदभवू लागली आहे.
मे महिन्यात दोन चित्त्यांचा मृत्यू
गेल्या महिन्यात चार दिवसांच्या अंतराने दोन चित्त्यांचा मृत्यू झाला होता. तेजस नावाच्या चित्त्याचा ११ जुलै रोजी तर सूरज नावाच्या चित्त्याचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला होता. तेजस आणि आणखी एका दुसऱ्या चित्त्याची लढाई झाली होती. दुसऱ्या चित्त्याशी झालेल्या लढाईनंतर बसलेल्या मानसिक धक्क्यातून तो सावरला नव्हता. ही गोष्ट शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाली होती.
तर तत्पूर्वी २७ मार्च रोजी साशा नावाच्या मादी चित्त्याचा किडनी विकारामुळे मृत्यू झाला होता. तर उदय हा चित्ता हृदयक्रिया बंद पडल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. दक्षा नावाची मादी चित्ता समागमदरम्यान नराशी भांडल्यानंतर जखमी झाली होती. तिच्या अंगावरील जखमा शेवटपर्यंत बऱ्या झाल्या नव्हत्या. त्यात तिचा मृत्यू झाला. २३ आणि २५ मे रोजी अतिउष्म्यामुळे चित्त्याच्या एकूण तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या