Chaos Again Over Taslima Nasreens Book : बांगलादेशची राजधानी ढाका येथे लेखिका तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकावरून मोठा गदारोळ झाला आहे. नसरीन यांनी लिहिलेलं पुस्तक बाळगल्याबद्दल मदरशातील विद्यार्थ्यांनी प्रकाशकाला मारहाण केली. तसेच पुस्तकांचा स्टॉलही फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नसरीन यांनी हा व्हिडिओ शेअर करत बांगलादेश सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मदरशाच्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने ढाका येथे आयोजित अमर एकुशे बुक स्टॉलवर हल्ला केला. याचे कारण म्हणजे नसरीन यांचे पुस्तक या स्टॉलमध्ये ठेवण्यात आले होते. नसरीन यांचे प्रकाशन सब्यसाची पब्लिकेशन्सच्या बुकस्टॉलवर ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तिंना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, "काही आंदोलक सब्यसाची पब्लिकेशनमध्ये आले आणि त्यांनी तस्लीमा नसरीन यांचे पुस्तक स्टॉलमध्ये का ठेवले या बाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रकाशक शताब्दी भव यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केला. त्यांनी त्यांना मारहाण करत तस्लिमा यांचे पुस्तक बूक स्टॉलमधून फेकून दिले. पोलिसांनी प्रकाशक शताब्दी भव आणि आंदोलकांना घटनास्थळावरून ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती शांत झाली.
पोलीस अधिकारी मसूल आलम यांनी एएनआयला सांगितले की, पुस्तक मेळाव्यात तोडफोडीची घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला. कौमी मदरसा आणि सब्यसाची प्रकाशनाच्या काही विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याने गोंधळ उडाला होता. आम्ही दोन्ही बाजूंच्या व्यक्तिंना पोलिस ठाण्यात आणले असून चौकशी सुरू आहे. सध्या परिस्थिती शांत आहे व पूर्णपणे नियंत्रणात आहे.
नसरीन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बांगलादेशातील पुस्तक मेळाव्यातील सब्यसाची पब्लिशर्सच्या स्टॉलवर जिहादी धर्मांधांनी हल्ला केला. त्यांचा गुन्हा असा होता की त्यांनी माझं पुस्तक प्रकाशित केलं होतं. पुस्तक मेळाव्याचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी माझे पुस्तक प्रदर्शनातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुस्तक हटवल्यानंतरही आंदोलकांनी प्रकाशकावर हल्ला केला, तोडफोड केली आणि स्टॉल बंद केला. सरकार या अतिरेक्यांना पाठिंबा देत असून जिहादी कारवाया देशभरत पसरत आहेत. विशेष म्हणजे हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळावा आहे.
संबंधित बातम्या