Chandrayaan 3 Moon Landing : चंद्रयान तीन चंद्रावर उतरण्यास सज्ज झाले आहे. देशासोबत सर्व जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागून आहे. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाल्यास असा करणारा तो तिसरा देश ठरणार आहे. बुधवारी (दि २३) संध्याकाळी ६ च्या सुमारास हे यान चंद्रावर उतरेल. पण जर यावेळी काही समस्या निर्माण झाल्यास इस्रोने प्लॅन बी रेडी ठेवला आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली, यादरम्यान त्यांनी चांद्रयान ३ ची स्थिती आणि इस्रोच्या तयारीची माहिती त्यांना दिली.
चांद्रयान-३ च्या लँडिंगमध्ये काही अडचण आल्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोही वेळ बदलू शकते. इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम देसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंगमध्ये काही समस्या अथवा अडथळे असल्यास चंद्रावर यान उतरवण्याची ही प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते.
अहमदाबादमधील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे (इस्रो) संचालक देसाई यांनी सॉफ्ट लँडिंगबाबत पुढील योजनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, '२३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी, लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन यान चंद्रावर उतरणे योग्य आहे की नाही हे आम्ही ठरवू. जर परिस्थिती आमच्या अनुकूल नसेल तर आम्ही २७ ऑगस्ट रोजी यान चंद्रावर उतरवू. कोणतीही अडचण यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी चांद्रयान ३ च्या स्थितीची आणि इस्रोच्या तयारीबद्दल माहिती त्यांना दिली. इस्रो प्रमुखांनी सिंह यांना चांद्रयान ३ ची सद्यस्थिती काय आहे याची देखील माहिती त्यांना दिली. यानाच्या सर्व यंत्रणा योग्यरित्या काम करत आहेत आणि बुधवारी कोणतीही समस्या येण्याची शक्यता कमी आहे, असे देखील ते म्हणले.
इस्रोने रविवारी माहिती दिली होती की चांद्रयान ३ हे २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्रोच्या अधिकृत वेबसाइट (https://isro.gov.in), YouTube (https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss), Facebook (facebook.com/ISRO) वर चंद्रयान-3 लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या