मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Congress : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात भाजपच्या वाटेवर?, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 07, 2023 02:23 PM IST

Balasaheb Thorat : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे.

Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat
Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat (HT)

Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पदवीधर निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. याशिवाय थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदाचा राजीनामाही दिला असून त्यामुळं आता बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी पदवीधर निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाची मदत घेणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता थोरात यांनी नाना पटोले यांच्याबरोबर काम करणं अशक्य असल्याचं दिल्लीतील नेत्यांना कळवलं आहे. त्यामुळं आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याशिवाय थोरात यांच्या भाजपप्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये यायचं असेल तर तो येऊ शकतो. आम्ही सर्वांचं स्वागतच करत आहोत, आमच्या राजकीय पक्षाचा विस्तार करणं हे आमचं काम असून बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो, ते भाजपात येणार असतील तर त्यांचा सन्मान ठेवला जाईल, असं म्हणत बावनकुळे यांनी थोरातांच्या भाजप प्रवेशावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली असली तरी ते भाजपामध्ये प्रवेश करतील असं मला वाटत नाही. थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे. पडत्या काळात त्यांनी काँग्रेसला सावरलं होतं, त्यामुळं ते भाजपमध्ये येतील असं मला वाटत नाही. परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

IPL_Entry_Point