Port Blair: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं, आता ‘या’ नावानं ओळखलं जाणार-centre renames port blair as sri vijaya puram announces amit shah ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Port Blair: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं, आता ‘या’ नावानं ओळखलं जाणार

Port Blair: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं, आता ‘या’ नावानं ओळखलं जाणार

Sep 13, 2024 06:31 PM IST

अंदमान-निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपुरम' करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली.

पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं
पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं

Port Blair Name Changed : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत केंद्रशासित प्रदेश अंदमान व निकोबार बेटांची राजधानी असलेल्या बोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) ही घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची (Andaman and Nicobar ) राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं असून पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. अमित शहा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. 

या पोस्टमध्ये शहा यांनी म्हटले की, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा लाभला होता. श्री विजयपुरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मिळवलेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान व निकोबार बेटांच्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक आहे.

अंदमान-निकोबार बेटांना आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदलतळ म्हणून काम करणारा हा बेट प्रदेश आज आपल्या सामरिक आणि विकासाच्या आकांक्षांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे.

याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला आणि ज्या सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र राष्ट्रासाठी संघर्ष केला. श्री विजयपुरम ही अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. 

ग्रेट निकोबार प्रकल्प -

निकोबार बेट केंद्राच्या ७२,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे चर्चेत आहे, ज्यामुळे मूळ शोम्पेन जमातीविस्थापित होण्याची भीती काहींना आहे.

शोम्पेन हे प्रामुख्याने संपर्क नसलेले भटके शिकारी असून निकोबार बेटावर त्यांची लोकसंख्या २४४ आहे. २००४ च्या त्सुनामीनंतर ते जंगलात गेले असल्याने शोम्पेन लोकवस्ती नसलेल्या भागासाठी हा प्रकल्प प्रस्तावित असल्याचा दावा स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारमधील २१ बेटांना गेल्या जानेवारीत पराक्रम दिनानिमित्त परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपवर उभारण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण ही पंतप्रधानांनी केले होते.

Whats_app_banner
विभाग