मराठी पाऊल पडते पुढे… लष्करासाठीचे फायटर प्लेन बनवणाऱ्या संस्थेच्या प्रमुखपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती-centre government appoints jitendra jadhav as new head of aeronautical development agency ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मराठी पाऊल पडते पुढे… लष्करासाठीचे फायटर प्लेन बनवणाऱ्या संस्थेच्या प्रमुखपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती

मराठी पाऊल पडते पुढे… लष्करासाठीचे फायटर प्लेन बनवणाऱ्या संस्थेच्या प्रमुखपदी मराठी व्यक्तीची नियुक्ती

Sep 13, 2024 08:57 PM IST

मुळचे पुण्याचे असलेले जितेंद्र जाधव यांची बेंगळुरूच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे जितेंद्र जाधव बेंगळुरूच्या लष्करी लढाऊ विमान निर्मिती संस्थेच्या प्रमुख
पुण्याचे जितेंद्र जाधव बेंगळुरूच्या लष्करी लढाऊ विमान निर्मिती संस्थेच्या प्रमुख

मुळचे पुण्याचे असलेले जितेंद्र जाधव यांची बेंगळुरूच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही घोषणा केली आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (Aeronautical Development Agency - ADA) द्वारे लष्करी विमानांची रचना करण्यात येते. सध्या भारतीय हवाई दलात वापरले जात असलेले तेजस जातीच्या लढाऊ विमानासाठी इनिशियल ऑपरेशनल क्लिअरन्स (IOC) चे नेतृत्व जितेंद्र जाधव यांनी केले होते. एडीए संस्थेमध्ये जाधव यांचा ‘तेजस’ लढाऊ विमानाची मार्क 2 आवृत्ती तसेच 5 व्या पिढीतील प्रगत अशा मध्यम दर्जाच्या लढाऊ विमान निर्मितीच्या कार्यक्रमाला अग्रक्रम असणार आहे. 

 ही लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) निर्मिती प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १९८४ साली एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची स्थापन केली होती. ADA ही संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेद्वारे तेजस विमान विकसित करण्यात आले होते. या संस्थेद्वारे आता दोन इंजिन असलेले Twin Engine Deck Based Fighter (TEDBF) विमानासाठीचे डिझाइन तयार करून विकसित करण्यात येणार आहे. हे विमान भारतीय नौदलात वापरले जाणार आहे.

जितेंद्र जाधव यांचा अल्पपरिचय

जितेंद्र जाधव यांचा जन्म १९ डिसेंबर १९६५ साली पुण्यामध्ये झाला. त्यांनी १९८७ साली पुण्यातून बीई (ईलेक्ट्रॉनिक्स) चे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी संस्थेतून एमएसची पदवी प्राप्त केली. लष्कर, नौसेना, हवाई दल, औद्योगिक आणि रेल्वे साठी लागणारी उपकरणांची रचना करून विकसित करण्याचा जाधव यांना २९ वर्षांपेक्षा अधिक काळचा अनुभव आहे. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीत दाखल होण्यापूर्वी ते बेंगळुरू स्थित नॅशनल एरोस्पेस लेबॉर्टरीचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमधील प्रयोगशाळेचा विकास करण्यासाठी धोरण आखणे आणि भविष्यात या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML) आणि मानवरहित-टीमिंग (MUM-T) तंत्रज्ञानाचा  वापर हे जाधव यांच्यासमोर ध्येय असणार आहे.

'जाधव हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून ते १९९९ पासून एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये वैज्ञानिक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे लढाऊ विमाने, नागरी वाहतूक विमाने आणि उड्डाण प्रशिक्षक संबंधित यंत्रणांचे डिझाइन आणि त्याचा विकास या क्षेत्राचा सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.' असं एडीएने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

 

Whats_app_banner