
Railway Employee's Bonus : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मोदी मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनस योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. आज ( गुरुवार) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाकडून यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेच्या चांगल्या कामगिरीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यां ना २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनसला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा ११ लाख ७२ हजार २४० कर्मचाऱ्यांना होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, टेक्निशियन असिस्टंट, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि ग्रुप एक्ससीचे इतर कर्मचारी अशा विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे.
या घोषणेपूर्वी रेल्वेच्या अनेक संघटनांनी सहाव्या वेतन आयोगाऐवजी सातव्या वेतन आयोगावर आधारित उत्पादकतेशी निगडित बोनसची मागणी करत गुरुवारी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती. यापूर्वी आयआरईएफने आपल्या मागणीच्या समर्थनार्थ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आयआरईएफचे राष्ट्रीय सरचिटणीस सर्वजीत सिंह म्हणाले, 'सहाव्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतनाच्या आधारे आम्हाला दरवर्षी उत्पादकतेशी संबंधित बोनस मिळतो, जो अन्यायकारक आहे. बोनसची रक्कम १७,९५१ रुपये आहे, जी ७,००० रुपयांच्या वेतनश्रेणीवर मोजली जाते, जी आता लागू होणार नाही कारण सातव्या वेतन आयोगाने किमान वेतन १८,००० रुपये निश्चित केले आहे.
संबंधित बातम्या
