CBSE board exam news : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं २०२५ च्या इयत्ता १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली आहे. विलंब शुल्क टाळण्यासाठी शाळांनी ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे.
इयत्ता १० आणि १२ मधील विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरणं आणि parikshasangam.cbse.gov.in या पोर्टलद्वारे नोंदणी करणं आवश्यक आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची व परीक्षार्थींची यादी (LOC) सबमिट करण्यासाठी जबाबदारी शाळांची असेल. दिलेल्या मुदतीपर्यंत परीक्षा शुल्क देखील भरणं आवश्यक आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती, शाळा संलग्नता आणि विषय निवडी यासारखे आवश्यक तपशील द्यावे लागतात. एकदा नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे परीक्षेच्या तारखांच्या आधी मिळतात.
सीबीएसई बोर्ड परीक्षा नोंदणीसाठी ४ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत नोंदणी न केल्यास १५ ऑक्टोबरपर्यंत प्रति विद्यार्थी २००० रुपये विलंब शुल्कासह परीक्षार्थींची यादी सबमिट करता येणार आहे.
नोंदणी अर्जातील सर्व तपशील अचूक असावा. हा तपशील गुणपत्रिका आणि रोल नंबर सारख्या अधिकृत कागदपत्रांमध्ये वापरला जाणार आहे. त्यामुळं अर्जात हा तपशील योग्य पद्धतीनं भरला असल्याची खात्री शाळांनी करून घेणं गरजेचं आहे. एखादी त्रुटी राहिल्यास CBSE रेकॉर्डमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी विषय सांकेतांक (Subjec Code) बरोबर आहे का हे देखील नीट तपासावे. नोंदणीनंतर यात बदल करता येणार नाही.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. शेवटच्या क्षणी कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये यासाठी शाळांनी CBSE पोर्टलवरील अधिकृत सूचना पहाव्यात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी आपापल्या शाळांशी संपर्क साधावा.
संबंधित बातम्या