CBSE Board Exams 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. ही तयारी करत असतांना परीक्षेसंबंधी काही प्रश्न देखील मुलांना पडत आहे. जसे की, नमूना प्रश्न पत्रिकेतून प्रश्नविचारले जातील का ? शब्दमर्यादा ओलांडल्यास गुण कापले जातील का? किंवा, अंतिम निकालात प्री-बोर्ड मार्क घेतले जातात का?
विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सीबीएससीच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. cbse.gov.in या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे उत्तरे देण्यात आले आहेत. प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडूंन वारंवार विचारले जाणाऱ्या १० महत्वाच्या प्रश्न (एफएक्यू) आणि बोर्डाने दिलेल्या सूचना व उत्तरे तयार करण्यात आली आहेत. ती उत्तरे खालील प्रमाणे आहेत.
सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, सादरीकरणासाठी वेगळे गुण दिले जात नसले तरी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून उत्तरे नीटनेटकी, व्यवस्थित असावीत, अशी अपेक्षा आहे.
बोर्डाच्या म्हणण्यानुसार, प्री-बोर्ड परीक्षेतून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी कशी तयारी करावी याचा अंदाज येतो. यातून किती तयारी झाली आहे याचा देखील अंदाज येतो. विद्यार्थी या परीक्षेला पात्र झाले नसले तरी त्यांना बोर्डाच्या परीक्षेस बसण्यापासून रोखता येणार नाही.
इतर मुलांनी किंवा तुमच्या मित्रांनी कितीही वेळा अभ्यासक्रमाचा अभ्यास करून रिवाईज केला असेल व तुमचा एकदाही पूर्ण झाला नसेल तर टेंशन घेऊ नका. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. फक्त परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला मंडळाने दिला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करून दैनंदिन वेळापत्रक तयार करून अभ्यास करून परीक्षेचा सराव करावा.
सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, प्री-बोर्ड परीक्षेत मिळालेले गुण बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांमध्ये जोडले जात नाहीत किंवा समाविष्ट केले जात नाहीत.
बोर्डाच्या परीक्षेत व्हाईटनर वापरण्यास परवानगी नसली तरी विद्यार्थ्यांना निळ्या किंवा शाही तसेच निळा शाई जेल पेन वापरण्याची परवानगी आहे.
सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, शब्दमर्यादा ओलांडल्यास कोणतेही गुण कापले जात नाहीत. मात्र, स्पेलिंगच्या चुका आणि इतर त्रुटींसाठी भाषेच्या पेपरमधील गुणांमध्ये कपात केली जाते.
नमुना प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नांची रचना, पॅटर्न आणि प्रकार जाणून घेण्यास मदत करतात, असे बोर्डाने म्हटले आहे. तथापि, परीक्षेतील प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्याही भागातील असू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण अभ्यासक्रमातून तयारी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
सीबीएसई विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निवडक विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला देत नाही. मंडळाने प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण अभ्यासक्रमातून सखोल अभ्यास करून सर्व संकल्पना समजून घेणे अपेक्षित आहे.
लेखनाचा वेग सुधारण्यासाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून सराव करण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त, परीक्षेच्या वेळी कोणतेही उत्तर लिहिण्यापूर्वी, त्यांनी त्यांच्या कल्पनांचे व उत्तराचे नियोजन केले पाहिजे आणि वेळ कमी असल्यास उत्तरे वेगाने लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पेपर संपूर्ण सोडवने अपेक्षत आहे.
अफवा आणि खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला सीबीएसईने विद्यार्थ्यांना दिला आहे. बोर्डाकडे परीक्षा घेण्याची फुलप्रूफ यंत्रणा आहे. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती आल्यास त्यांनी तात्काळ ई-मेल किंवा फोनद्वारे मंडळाशी संपर्क साधावा.
दहावीची अंतिम परीक्षा १८ मार्चला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा एकाच वेळेत सकाळी १०.३० वाजता होणार आहेत. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी देशातील आठ हजार शाळांमधील सुमारे ४४ लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
संबंधित बातम्या