Sameer Wankhede And Shah Rukh Khan Chat : कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडे समीर वानखेडे यांनी लाच मागितल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्यानंतर आता आज हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनी समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषण उघड केलं आहे. त्यात शाहरुख खान वानखेडे यांना आर्यनची काळजी घेण्यास सांगत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शाहरुख खान- मला कॉल कर, आर्यन खानचा वडील म्हणून मी तुझ्याशी बोलत आहे. तू एक चांगला माणूस आणि पती आहेस. कायद्याच्या चौकटीत राहून मी माझ्या कुटुंबासाठी तुझ्याकडे मदत मागत आहे.
शाहरुख खान- माझ्या मुलाला जेलमध्ये जाऊ देऊ नकोस, मी तुझ्याकडे भीक मागत आहे. कारण जेलमध्ये गेल्यानं तो खचून जाईल.
शाहरुख खान- माझ्या मुलाला तू बदलून टाकशील, असं तू मला प्रॉमिस केलं आहे. माझ्या परिवारावर दया कर, माझ्या मुलाला घरी पाठव, एक वडील म्हणून मी तुझ्याकडे भीक मागतो.
समीर वानखेडे- शाहरुख खान मी तुला फार चांगला माणूस म्हणून ओळखत होतो. जे होईल ते चांगलं होणार आहे. तू तुझी काळजी घेत रहा.
समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषणात कुठेही खंडणी अथवा पैशांची मागणी करण्यात आलेली नाही. याचे पुरावे समीर वानखेडे यांनी कोर्टात सादर केले आहे. समीर वानखेडेने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्याकडे आर्यनला सोडवण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक दावा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला होता.